पुणे/किरण शिंदे : घरात काम करणाऱ्या विश्वासू नोकरानेच घरातील ज्येष्ठ सदस्यांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन जबरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फॉरेस्ट कॅसल सोसायटीत हा प्रकार घडला. यामधील घरघड्याने तब्बल 24 लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरुन नेले आहेत.
नरेश शंकर सौदा (वय 22) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रीती विहीन हुन (रा. प्रभादेवी मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या मुंबईतील प्रभादेवी परिसरात राहतात. तर त्यांचे आई-वडील मुंडवा परिसरातील फॉरेस्ट कॅसल सोसायटीत राहतात. आरोपी नरेश शंकर सौदा हा त्यांच्या घरात नोकर म्हणून काम करत होता. अनेक दिवसांपासून काम करत असल्याने तो विश्वासू देखील होता. मात्र 4 डिसेंबरच्या रात्री त्याने फिर्यादीची आई आणि वडील त्यांना जेवनातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर हे दोघेही बेशुद्ध झाल्यानंतर घरातील लोखंडी पत्राचे कपाट उघडून 286 ग्रॅम सोन्याचे, हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 23 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून निघून गेला आहे. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.