पुणे : गोव्यातून पुण्यात आलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला आता संभाजी ब्रिगेडनेदेखील आपला विरोध दर्शवला आहे. दोन वर्षांपासून पुण्यात होत असलेल्या या फेस्टिव्हलला हिंदू जनजागृती समिती विरोध करीत आली आहे. आता सनबर्न फेस्टिव्हल हा दारूड्या संस्कृतीचा व अमली पदार्थांचा खुला बाजार आहे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडकडून विरोध करण्यात आला आहे.अनेक वर्षांपासून डिसेंबरमध्ये गोव्यात होणारा सनबर्न फेस्टिव्हल गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात होत आहे. पुण्यात हा फेस्टिव्हल सुरू झाल्यापासून वादात सापडला आहे. पुण्यात पहिल्या वर्षी हा फेस्टिव्हल केसनंद येथे झाला होता. त्या वेळी टेकडी फोडून रस्ता तयार केल्याचा आरोप करण्यात आला होता. दुसऱ्या वर्षी हा फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड येथे भरविण्यात आला होता.सनबर्न फेस्टिव्हलला वेळेची मर्यादा नसते; मात्र शिवजयंती, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव कायद्याचा बडगा दाखवून रात्री १० वाजता बंद केले जातात. सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते. सनबर्न फेस्टिव्हलमध्ये रात्रभर अमली पदार्थांचे प्रचंड सेवन होते. यामुळे तरुण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरुण मुले-मुली दारू पिऊन व अमली पदार्थांचे सेवन करून दररोज धिंगाणा घालत फिरतात. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे.समता, समानता व बंधुता प्रस्थापित करणारे व महाराष्ट्राला चांगली दिशा देणारे शहर आहे. पुणे जिजाऊ-शिवरायांचे, महात्मा फुले व जेधे-जवळकरांचे पुरोगामी शहर आहे. शिक्षणाचे हब असून सर्व धर्मांची संस्कृती जपणारे शहर आहे. याच पुण्यात हा धर्मद्रोही उत्सव चालणार नाही, असे ब्रिगेडकडून ठणकावून सांगण्यात आले आहे. तसेच, प्रशासनाने या फेस्टिव्हलला परवानगी नाकारावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.सनबर्न फेस्टिव्हल हा पाश्चिमात्य संस्कृतीचे समर्थन करणारा तसेच या फेस्टिव्हलमध्ये अमली पदार्थांचे सेवन केले जाते, असा आरोप याआधी हिंदू जनजागृती समितीकडून गेली दोन वर्षे करण्यात आला आहे. आता संभाजी ब्रिगेडनेसुद्धा या फेस्टिव्हलला विरोध दर्शविला आहे. सनबर्न फेस्टिव्हल हा दारूड्या संस्कृतीचा व अमली पदार्थांचा खुला बाजार आहे. हा सरकार पुरस्कृत अश्लील पाश्चात्त्य संस्कृतीचा नंगा नाच, अशी टीका संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येत आहे.
हिंदू जनजागृती समितीनंतर संभाजी ब्रिगेडचा ‘सनबर्न’ला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 3:29 AM