पुणे :पुणे शहर वेगाने विकसित होत आहे. मगरपट्टा, हिंजवडी, विमाननगर, खराडी परिसरातील आयटी कंपनी तसेच ग्रामीण भागातील औद्योगिक कारखान्यामुळे पुण्याच्या चहुबाजूने विकास होत आहे. येथे काम करणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निवासी संकुल होत आहे. मेट्रो, रिंगरोड, अंतर्गत रस्ते, पीएमपीएलच्या सार्वजनिक सुविधेमुळे वाहतूक-दळणवळण अधिक सुखकर होत आहे. रोजगार आणि राहण्यायोग्य उत्तम शहर असल्याने पुण्याकडे स्थलांतर वाढले आहे. परिणामी, येथील जागेच्या आणि फ्लॅट्सच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. कोथरूडसह सिंहगड रस्त्याला ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. येथील प्लॉट, फ्लॅटचे पाच वर्षात जवळपास दुप्पट भाव झाले आहेत, असे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
कोणत्या परिसरात काय भाव?
परिसर-पाच वर्षांपूर्वीचे दर-सध्याचे दर-झालेली वाढ (टक्क्यात)
१) सिंहगड रस्ता -३०००-५५०० -८३%
२) कोथरूड - ५०००- ९०००-८०%
३) हडपसर-३५००-४५००-२८%
४) येरवडा -३०००-४५००-५०%
५) पिंपरी-चिंचवड-४०००-५०००-२५%
बांधकाम व्यावसायिकांचे मत
१) पुढील ५ वर्षात सर्वात वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पुणे ओळखले जाईल. एनआरआय भारत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांना पुणे हे सुरक्षित, सांस्कृतिक शहर वाटते. पुण्याच्या वाढीत मेट्रो, रस्ते, रिंगरोड यांचा मोठा वाटा आहे. या विस्तारामुळे शहराचा केंद्रबिंदू सरकत आहे. ती अतिशय नियोजनबद्ध असल्याने ते जरी शहरापासून लांब वाटले तरी प्रवासाचा लागणारा कमी वेळ लक्षात घेऊन आणि सध्या तिथे असणारा परडवणारा दर यामुळे घर घेण्याची योग्य वेळ आजच आहे.
- महेश कुंटे, बांधकाम व्यावसायिक
२) मुंबईपाठोपाठ पुणे हे महाराष्ट्रातले वेगाने विकसित होत असलेले शहर आहे. हिंजवडी, खराडी परिसरातील आयटी कंपनी, शहराबाहेरील परिघात असणाऱ्या औद्योगिक कारखाने यामुळे पुण्याच्या चहुबाजूने रहिवासी संकुले तयार होत आहे. वाढते मेट्रोचे जाळे, सुनियोजित रस्ते, सार्वजनिक वाहतूक यामुळे दळणवळण अधिक सोयीस्कर झाल्याने तसेच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील अन्य शहरातून स्थलांतर वाढल्याने जागेच्या आणि फ्लॅट्सच्या किमतीमध्ये कायमच वाढ होणार आहे.
- कल्पना डांगे, बांधकाम व्यावसायिक.