पुणे : महापालिका प्रशासनाने कन्टेन्मेंट झोन वगळता ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचा फायदा घेत काही प्रकाशकांनी दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आकर्षक योजना आणि अभिनव संकल्पनांसह व्यवसायाचा पुन्हा '' श्रीगणेशा'' केला आहे. आता प्रकाशकांना प्रतीक्षा आहे, ती ग्राहकांची! इतर क्षेत्रांप्रमाणेच लॉकडाऊनचा फटका हा प्रकाशन व्यवसायाला देखील बसला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी-विक्री होते. मात्र लॉकडाऊन काळात प्रकाशन व्यवसायावरच संक्रांत ओढवली आहे. महाराष्ट्र कोरोनामुक्त झाला तरी प्रकाशन व्यवसायाची घडी पुन्हा बसण्यास काहीसा विलंब लागणार आहे. कारण या लॉकडाऊन काळात वाचक हा पुस्तकांपासून दूर गेला असून, ऑनलाईन वाचनाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे वाचकांना पुन्हा पुस्तकांकडे आकृष्ट करण्यासाठी प्रकाशकांनी चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. महापालिका प्रशासनाने ग्रीन आणि ऑरेज झोनमध्ये वारनिहाय दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे या झोनअंतर्गत येणाऱ्या काही प्रकाशकांनी आपली पुस्तक दालनं वाचकांसाठी सुरू केली आहेत तर काही प्रकाशक आपली दालनं खुली करण्याच्या मार्गावर आहेत. ही पुस्तक दालनं खुली करताना वाचकांना पुस्तकांवर 25 टक्के सवलत देण्याबरोबरच ग्रंथालयाच्या सदस्यांसाठी मोफत पुस्तक वाचन योजना अशा काही नव्या संकल्पना राबविल्या जात आहेत. --------------------------------कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आम्ही दि. 15 मार्चपासून पुस्तक पेठ बंद ठेवली होती. पण आता सरकारी आदेशानुसार दुकाने उघडता येणार आहेत.त्यानुसार उद्यापासून ( 12 मे) सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुस्तक पेठ वाचकांसाठी खुली ठेवली जाणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियम पाळले जाणार आहेत. दि. 31 मे पर्यंत पाकशास्त्र विषयांवरची सर्वपुस्तके, सर्व समीक्षाग्रंथ, सर्व कवितासंग्रह हे 25 टक्के सवलतीत दिली जाणार असून, 500 रूपयांवरील खरेदीवर हँड सँनिटाईजर मोफत दिले जाणार आहे. आता प्रतीक्षा वाचकांची आहे- संजय भास्कर जोशी, पुस्तक पेठ--------------------------------------------------------आम्ही सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत आम्ही पुस्तकाचं दुकान सुरू ठेवलं आहे.पण अजूनतरी प्रतिसाद शून्य आहे. रोज दारूसाठी आमच्या दुकानासमोरून रांग जाते. त्यातील काही लोकांना पुस्तक घ्या असे सांगितले जाते पण कुणी घेत नाही. वाचक इतका कसा बिघडला असे वाटते. पण उद्या (12 मे) पासून आमच्यालायब्ररीच्या 450 सदस्यांना पुस्तक मोफत घेऊन जा. वर्गणी देऊ नका असं सांगितल आहे- सु.वा जोशी, उत्कर्ष प्रकाशन.------------------------------------------------------------लॉकडाऊन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या की त्यामधून वेगळा मार्ग काढायची संधी मिळाली नाही. मग वाचकांशी संवाद राहावा याकरिता कायकरता येईल या विचारामधून एक संकल्पना पुढे आली. लेखकांनी स्वत: घरी व्हिडिओ क्लिप तयार करून ती राजहंसकडे पाठवायची. राजहंसच्या एकत्रित टीममुळे संवाद राजहंसी साहित्यिकांशी अशा शीर्षकांतर्गत एक दिवसाआड फेसबुकवर 5.30 वाजता या क्लिप अपलोड करण्यात आल्या. हा उपक्रम दि. 31 मे पर्यंत चालेल. तो त्याच पद्धतीने पुढे चालविण्याची आमची योजना आहे- डॉ. सदानंद बोरसे, राजहंस प्रकाशन----------------------------------------------------------लॉकडाऊन काळात प्रकाशन व्यवसायाचं नुकसान झालं आहे. आम्ही सध्या चाचपडतो आहे. जवळपास 25 टक्के प्रकाशकांनी पुस्तक दालनं उघडली आहेत. मात्र अद्यापही वाचकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत पुस्तकांची दुकाने सुरू आहेत. मात्र रोज एक किंवा दोनच वाचक येत आहेत - राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशकसंघ
लॉकडाऊननंतर आकर्षक योजना आणि अभिनव संकल्पनांसह प्रकाशन व्यवसायाचा पुन्हा "श्रीगणेशा"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:00 AM
इतर क्षेत्रांप्रमाणेच लॉकडाऊनचा फटका हा प्रकाशन व्यवसायाला देखील बसला..
ठळक मुद्दे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची होते खरेदी-विक्रीप्रकाशन व्यवसायाची घडी पुन्हा बसण्यास काहीसा विलंब लागणार