पुणे : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १४ वा ‘वसंतोत्सव’ १९ ते २१ फेब्रुवारी या दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. कोरोनाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर रसिकांना महोत्सवाच्या माध्यमातून अभिजात मैफलीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.
यंदाचा वसंतोत्सव डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षपूर्ती सोहळा म्हणून होणार असल्याची माहिती डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू व प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नेहा देशपांडे, राजेश उपाध्ये उपस्थित होते.
‘वसंतोत्सवा’त दुपारी चार ते रात्री दहा या वेळेत मैफली रंगणार असून, महोत्सवाची सुरुवात पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या गायनाने होईल. ज्येष्ठ धृपद गायक पं. उदय भवाळकर यांचे गायन होणार आहे. पहिल्या दिवसाच्या समारोपात सुजात हुसेन खान (सतार), मुकेश जाधव (तबला), रणजीत बारोट (तालवाद्य) व सहकलाकार यांचा कलाविष्कार सादर होणार आहे. दि.२० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध सतार वादक शाकीर खान यांचे वादन, शास्त्रीय गायक विजय कोपरकर यांचे गायन, हिंदुस्तानी व दक्षिणात्य शास्त्रीय संगीताचा मेळ साधत प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया व वेणू बासरीचे मास्टर शशांक सुब्रमण्यम यांचे बासरी वादन आणि गायक आनंद भाटे यांचे गायन अशा मैफली रसिकांना अनुभवता येणार आहेत. दि. २१ फेब्रुवारी रोजी पं. योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव व पं. नयन घोष यांचे पुत्र व शिष्य ईशान घोष यांचे एकत्रित तबला वादन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पंकज उधास यांचा गझल गायनाचा कार्यक्रम ऐकता येईल. महोत्सवाचा समारोप राहुल देशपांडे यांच्या गायनाने होणार असून त्यांना सारंगीवादनाची साथ मुराद अली करणार आहेत.
----------
‘अभिजात संगीतातून एकप्रकारची शांतता मिळते. संगीतात आंतरबाह्य बदलण्याची विलक्षण ताकद आहे. जिवंत कलेच्या सादरीकरणातून एक प्रकारची उर्जा मिळते. याच जाणीवेतून कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सर्व ती खबरदारी घेऊन आम्ही ‘वसंतोत्सव’ करीत आहोत.
- राहुल देशपांडे, प्रसिद्ध शास्त्रीय गायक
------------------------------------------