पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच असून सर्व भाषांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व समजावून सांगितले गेले पाहिजे. भगवान श्रीकृष्णानंतर सदैव सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार असलेले नजीकच्या इतिहातील एकमेव व्यक्तीमत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
पुण्यातील सारस अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा ५० वा वर्धापन दिन व देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात पुरंदरे यांचे शंभराव्या वर्षांत पदार्पण व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब अनास्कर यांची नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते पुरंदरे व अनास्कर या दोहोंचा सत्कार करण्यात आला.
पुरंदरे म्हणाले, “ छत्रपती शिवाजी महाराजांना अवघे ५० वर्षांचे आयुष्य लाभले, मला १०० वर्षांचे लाभले. पण माझ्या १०० वर्षांच्या आयुष्यात देखील मला महाराज पूर्ण समजले असा दावा मी करू शकत नाही.” शंभरीकडे वाटचाल करताना मी सध्या म्हातारपण आणि बाल्यावस्था कसे सारखेच असतात याचा अनुभव घेतो आहे. शिवचरित्र करमणूकीसाठी नाही तर शिकण्यासाठी आहे, याची जाणीव असायला हवी. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.