पुणे : "आज अनेक वर्षांनंतर बाहेरील जग पाहायला मिळालं आहे. आज इतकी लोकं पाहिल्यानंतर हरखून जायला झालं." हे उद्गार आहेत येरवडा कारागृहामार्फत चालवण्यात येणाऱ्या केशकर्तनालायत काम करणाऱ्या कैद्याचे.
येरवडा येथील खुल्या कारागृहातील चांगल्या वर्तुणुकीच्या कैद्यांमार्फत आता केशकर्तनालाय चालवण्यात येणार आहे. याचे उदघाटन पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते झाले, यावेळी येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु.टी.पवार उपस्तिथ होते.
कैद्यांना देखील सुधारण्याची संधी मिळावी तसेच शिक्षाभोगून बाहेर पडल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या हेतूने हा उपक्रम राबिवण्यात येत आहे. कारागृहाच्या बाहेरील बाजूस हे केशकर्तनालाय सुरू करण्यात आले असून नागरिकांना बाहेरील दरापेक्षा कमी दरात येथे सेवा मिळणार आहे. या केशकर्तनालायसोबतच इस्त्री चे देखील दुकान सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही उपक्रमाच्या माध्यमातून 7 ते 8 कैद्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांना सर्वसामान्यांनमध्ये मिसळून सुधारण्याची एक संधी मिळणार आहे. या आधी देखील कारागृह प्रशासनाकडून चांगल्या वर्तणुकीच्या कैद्यांमार्फत वॉशिंग सेंटर तसेच इस्त्रीचे शॉप चालवण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहाच्या बाहेर केशकर्तनालयामध्ये काम करण्याची संधी मिळालेला संतोष अटकर म्हणाला, 2013 साली एक गुन्ह्यात मला अटक झाल्यानंतर पंढरपूरच्या कारागृहात ठेवण्यात आले. त्यानंतर शिक्षा झाल्यानंतर येरवडा कारागृहात आणण्यात आले. मी बाहेर असताना दाढी, कटिंगचे काम करत होतो. त्यामुळे कारागृहात देखील मला हे काम देण्यात आले. आज अधीक्षक साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवून या बाहेरील केशकर्तनालायमध्ये सेवा देण्याची संधी दिली आहे. त्याच विश्वासाने मी काम करणार आहे. आज अनेक वर्षांनंतर बाहेरील जग पाहायला मिळालं आहे. आज इतकी लोकं पाहिल्यानंतर हरखून जायला झालं.
यु. टी. पवार म्हणाले, येरवडा कारागृहात अनेक कैदी आहेत की ज्यांची खुल्या कारागृहासाठी निवड होते. परंतु त्यांना बाहेर ठेवण्यासाठीची कुठली जागा नसते. या कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. खुल्या कारागृहातील 45 कैद्यांना विविध उपक्रमांध्ये सामावून घेण्यात येत आहे. या उपक्रमातून या कैद्यांना रोजगार मिळणार आहे तसेच शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर त्यांना स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करता येणार आहे. यातून त्यांना समाजात मान वर करून जगता येणार आहे.