लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “मोठ्या शहरात पारंपरिक मेट्रो ठीक आहे. समुद्र किंवा लांब नदीकिनारा असलेल्या शहरात ‘वॉटर मेट्रो’चाही प्राधान्याने विचार करायला हवा,” असे मत नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी व्यक्त केले. कोचीमध्ये असा मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत असून त्याची माहिती महामेट्रो व अन्य कंपन्यांनी घ्यावी अशी सुचनाही त्यांनी केली.
मिश्रा यांनी पुण्यातील महामेट्रो कार्यालयाला शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी भेट दिली. पुण्यातून त्यांनी देशातील विविध राज्यात सुरू असलेल्या मेट्रो कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांबरोबर संवाद साधला व ठिकठिकाणच्या प्रकल्पांची माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
मोठ्या व गर्दीच्या शहरांत नेहमीची मेट्रो फायद्याची ठरू शकते. मात्र देशात त्याशिवाय अन्य कमी लोकसंख्येची पण महत्वाची शहरेही आहेत. त्यांचीही भविष्यात वाढ होणार आहे, असे गृहित धरून त्यांच्यासाठी वेगळ्या पर्यांयांचा विचार व्हायला हवा असे ते म्हणाले. पुणे मेट्रो प्रकल्पाची मिश्रा यांनी माहिती घेतली. कोरोना काळात वेळ गेला असला तरी निश्चित केलेल्या मुदतीत काम व्हायला हवे. त्यासाठी कामाची गती वाढवावी,” असे मिश्रा म्हणाले.