लोकमत न्यूज नेटवर्कबाणेर : गेल्या महिन्यात बाणेर रस्त्यावर सुजाता श्रॉफ या महिलेने अनियंत्रितपणे कार चालवून पाच जणांना उडवले. या घटनेत लहान मुलगी व तिची आई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता महिन्याभरानंतर महापालिकेला जाग आली असून त्या ठिकाणी दुभाजकांची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ या रस्त्यावर अनेक ठिकाणी यापूर्वीच उंच दुभाजक उभारण्याचे काम पूर्ण झाले असताना या ठिकाणीच हे काम का राहिले होते, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे़बाणेर रस्त्यावरील अनियंत्रित व विस्कळीत वाहतूक व्यवस्था वठणीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. त्यांची अंमलबजावणी काही प्रमाणात सुरू झाली आहे. परंतु सुधारणा न झाल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांसह वाहनचालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. बाणेर परिसरासह हिंजवडी भागातील अनेक आयटी कंपन्यांत मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग, कामगार वर्ग नोकरीसाठी येत आहे. अनेक जण आपल्या स्वत:च्या गाड्यांमधून किंवा कंपनीच्या बसने कामावर येत असल्याने बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढली असल्याने वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. दुभाजकांचे अनावश्यक छेद काढणे, दुभाजकांवर रंगीत पट्टे मारणे, सूचनाफलक लावणे, दुभाजक नसलेल्या ठिकाणी ते बसविणे, गणराज चौकात ग्रेड सेपरेटर उभारणे, सक्षम सिग्नल यंत्रणा सुरू करणे, महामार्गाला येऊन मिळणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, पदपथ मोकळे करणे, फेरीवाले हटविणे, रस्ते अडविणाऱ्या आठवडा बाजारांवर कारवाई करणे, वाहतूक पोलिसांनी चौकाच्या वर्तुळक्षेत्रामध्ये उभे राहून वाहतूक नियंत्रण करणे आदी सुधारणा जोपर्यंत होत नाहीत तो या रस्त्यावरील वाहतूककोंडी व अपघातांची मालिका थांबणे अवघड असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.बाणेर रस्त्यावर हॉटेल व्यावसायिक व इतर कार्यालयेही मोठ्या प्रमाणावर आहेत. येथे नो पार्किंगचे फलक लावले होते. मात्र, ते काही व्यावसायिकांनीच काढून टाकल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. वाहतूक शाखेचे कर्मचारी मात्र या भागात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवासी करतात. नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या राधा चौकात सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरू असलेल्या या चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली असली तरी सध्या ती बंद अवस्थेत असल्याने नागरिक संभ्रमावस्थेत प्रवास करत आहेत. याबाबत चौकातून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून कमालीचा असंतोष व्यक्त केला जात आहे.ग्रीन पार्क ते सदानंद हॉटेल : निधी गेला वायामागील वर्षी बाणेर व पाषाण-बाणेर लिंक रस्त्यावरील दुभाजकांची उंची वाढविण्याच्या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातून बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावर दुभाजक उभारण्यात आले. मात्र हॉटेल ग्रीन पार्क ते हॉटेल सदानंद, बाणेर रस्त्यावर पडलेला निधी काही कारणांमुळे लॅप्स झाला. सध्या बाणेर रस्त्यावर मागील महिन्यात झालेल्या अपघाताच्या घटनास्थळापासून पुढे काही अंतरावर दुभाजकाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. हा जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असून नव्याने आर्थिक निधीची तरतूद करून संपूर्ण बाणेर रस्त्यावरील दुभाजकाची उंची वाढविण्याचे काम वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाने हाती घ्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.बाणेर रस्त्यावर दुतर्फा करण्यात येणाऱ्या सर्वव्यापी पार्किंगमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या जागेत झालेली कपात, वाहतुकीचे नियम न पाळणे, सिग्नलचा अवमान, मन मानेल तेथे वाहने वळवणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे अशा प्रचंड प्रकारच्या बेशिस्तीमुळे बाणेर रस्त्यावरील एकूण वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या सर्वांचा परिणाम पर्यावरणावरही होत आहे. - अमोल बालवडकर,नगरसेवक बाणेर परिसराचा ज्या गतीने विकास होत आहे. त्याच गतीने वाहनसंख्याही वाढत आहे. या वाढत्या वाहनांमुळे परिसरात होणारी वाहतूककोंडी व प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटनांवर आळा बसविण्याच्या दृष्टिकोनातून बाणेर रस्त्यावरील जे अपघातप्रवण स्थळे किंवा चौक आहेत, याचे शास्त्रशुद्ध अध्ययन करून त्यावर उपाय शोधले पाहिजेत.- बाबुराव चांदेरे, नगरसेवक बाणेर रस्त्यावर चौकाचौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात असतात. प्रमुख चौकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी न थांबता आडबाजूला थांबून नियम तोडून येणाऱ्या वाहनचालकाला अडवायचे. वाहन परवाना, कागदपत्रांची मागणी करायची, काही तरी कमतरता दाखवून दंडाची पावती फाडायची, असे वाहतूक पोलिसांचे प्रताप सुरू आहेत. हे चित्र प्राधान्याने बदलले पाहिजे.- ज्योती कळमकर, नगरसेविका नुकताच आम्ही पालिका अधिकाऱ्यांसोबत बाणेर, बालेवाडी भागातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांची पाहणी केली असून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी पेडेस्ट्रीयन क्रॉसिंग तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पेडेस्ट्रीयन क्रॉसिंग निर्मितीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच गणराज चौकात ग्रेड सेपरेटर निर्मितीसाठी आम्ही आगामी काळात सर्व नगरसेवक महापौर व आयुक्तांकडे पाठपुरावा करणार आहोत. - स्वप्नाली सायकर, नगरसेविका
महिन्याभरानंतर पालिकेला आली जाग
By admin | Published: May 30, 2017 3:02 AM