पुणे : निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेमध्ये ४९ हजार अर्ज आले असून यातील ३७ हजार ३७७ मतदारांची डेटा एंट्री पूर्ण झाली आहे, तर १२ हजार मतदारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. मुंबईपाठोपाठ पुणे राज्यामध्ये सर्वाधिक मतदार नोंदणी करणारा जिल्हा ठरला आहे. २ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीनुसार जिल्ह्यातील ७१ लाख ९६ हजार ७०१ मतदारांचा मतदार यादीत समावेश झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली. मतदार नोंदणीसाठी वर्षभरापासून जिल्हा निवडणूक शाखेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत. जनजागृती करण्याबरोबरच विद्यापीठ, महाविद्यालयीनस्तरावर युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यातील ७१ लाख ९६ हजार ७०१ मतदारांमध्ये पुणे शहरात २९ लाख १३ हजार २९८, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ११ लाख ९५ हजार ३६६ मतदार झाले आहेत. त्यामध्ये आणखी ४९ हजार मतदार अर्जांची भर पडली आहे. या मतदारांची माहिती भरून झाल्यानंतर १० जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ग्रामीण भागातील ३० लाख ८८ हजार ३७ मतदारांची नोंदणी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०१८ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया मतदारांसह १ जानेवारी २००० या दिवशी जन्म झालेल्या ‘सहस्त्रक मतदारां’ची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १५ डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले.
१० जानेवारीनंतर प्रसिद्ध केली जाणारी अंतिम मतदार यादी सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. तहसीलदारांच्या कार्यालयामध्येही या याद्या पाहता येऊ शकणार आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही या याद्या अपलोड करण्यात येतील. - मोनिका सिंह, उप जिल्हा निवडणूक अधिकारी
पुणे कँटोन्मेंट | २,९०,२८५ |
हडपसर | ४,४५,१११ |
खडकवासला | ४,५०,१३७ |
कसबा पेठ | २,८१,४६९ |
कोथरुड | ३,८१,४३५ |
वडगाव शेरी | ४,१९,८५६ |
पर्वती | ३,४७,२२४ |
शिवाजीनगर | २,९७,७८१ |
चिंचवड | ४,६४,०३७ |
पिंपरी | ३,३६,५०३ |
भोसरी | ३,९४,८२६ |