बारामती : शहरातील मालवाहतूक टेम्पोचोरी प्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली आहे. तर याप्रकरणी इतर दोघेजण फरारी आहेत. तब्बल एक वर्षानंतर चोरीला गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. यामध्ये दोन लाखांचा मालवाहतूक टेम्पो जप्त करण्यात आला आहे.पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सलमान मन्सूर शेख (वय २४, रा. महादेवमळा, पठाण बिल्डिंग, पाटस रोड, बारामती) याने फिर्याद दिली आहे. १४ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी ११ ते १५ फेब्रुवारीला ९ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. फिर्यादी शेख याच्या घराजवळून मालवाहतूक टेम्पोची (एमएच ४२ एम ५९४५) चोरी झाली. २ लाख रुपये किमतीच्या टाटा झीप या वाहनाबरोबरच त्यामध्ये ठेवलेले आरसी बुक कार्ड, पीडीसीसी बँक पासबुक, मुस्लीम बँक पासबुक आदींची चोरी झाली होती.चोरीला गेलेले वाहन तब्बल एक वर्षानंतर परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी आरोपी नीलेश संभाजी मोरे (वय २८, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यास अटक करण्यात आली आहे. या वेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी ओंकार सुनील राऊत, आशुतोष सुहास शिळवणे (दोघे रा. बारामती) या दोघांनी वाहन चोरून आणले. तसेच ते वाहन या दोघांनी माझ्याकडे ठेवण्यास दिले होते, असे आरोपी मोरे याने सांगितले. पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजय गोरड, पोलीस कॉन्स्टेबल तात्यासाहेब खाडे, दादासाहेब डोईफोडे, अविनाश दराडे यांनी चोरीला गेलेले वाहन जप्त केले आहे. (वार्ताहर)
चोरीला गेलेल्या टेम्पोचा एक वर्षानंतर शोध
By admin | Published: January 24, 2017 1:35 AM