पुणे : केंद्र सरकारने सीएनजीचे दर गुरुवारी आणखी १ रूपया ८० पैशांनी वाढवले आहेत. पुणे शहरात आता एका किलोसाठी ६३ रूपये ९० पैसे मोजावे लागणार आहे. गेल्या महिन्याभरात ६ रूपये ४० पैशांनी सिएनजीचे दर वाढले आहे. प्रथम ३ ऑक्टोबर रोजी प्रथम २ रूपयांनी, त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी आणखी २ रूपये ६० पैसे, तर आता १ रूपया ८० पैशांनी दरवाढ झाली आहे.
वाहतूक खर्च, शुद्धीकरण प्रक्रिया आणि बाटलीबंद करणे या तीन बाबींमुळे सीएनजी निर्मितीचा खर्च वाढला आहे. केंद्र सरकारला १ किलो सिएनजी बनवण्यासाठी साधरण ६ रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. सहा रूपयांपर्यंत दरवाढ करण्याचे संकेत दोन महिन्यांपूर्वी दिले होते.
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडील ३१ मे २०२१ च्या नोंदीनुसार पुणे शहरात आजमितीला ४१ लाख १९ हजार ५९७ वाहने आहेत. राज्य सरकार पेट्रोलवर ३४-३६, तर केंद्र सरकार ३०-३२ रुपये कर आकारत आहे. याबाबत दोन्ही स्तरावरून कर कमी करण्याबाबात सांगण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांनंतर केंद्र सरकारने डिझेलच्या दरात १० रूपये, तर पेट्रोल ५ रूपयांनी कमी केले आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप दर कमी करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही.