पुणे - पुलवामा हल्ल्याबाबत माजी संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त करण्याचा सल्ला मीच मोदी सरकारला दिला होता, असे पवार यांनी म्हटले आहे. पुण्यातील चाकण येथे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभेवेळी बोलताना, पवार यांनी हा गौफ्यस्फोट केला. त्यामुळे पवारांच्या या विधानानंतर एअर स्ट्राईकवरुन चांगलच राजकारण तापणार असल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पवार चाकण येथे आले होते. त्यावेळी बोलताना, पुलवामा हल्ल्याबाबत पवारांनी मोठा गौफ्यस्फोट केला. पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. तेव्हा, मी यापूर्वी संरक्षण मंत्री असल्याने पहिला प्रश्न मला विचारण्यात आला, त्यावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या, दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करा, असा सल्ला मीच दिला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री सितारामण उपस्थित नव्हते, असेही पवारांनी सांगितले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते, असे सांगत पवारांनी मोदींवर टीकाही केली होती. पुलमावा हल्ल्यानंतर देशात सीमारेषेवर तणा होता अन् ही 56 इंचाची छाती यवतमाळमध्ये येऊन बोलत होती, असे म्हणत मोदींना टोलाही लगावला.
दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर, देशात पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप उसळल्याचे दिसून आले.