पुणे : एका १४ वर्षाच्या मुलीची तपासणी करीत असताना डॉक्टरांनी तिला तुझ्याबाबत काही बॅड घडले का अशी विचारणा केली. तेव्हा तिने ४ वर्षापूर्वी घडलेल्या त्या कृत्यांची डॉक्टरांना माहिती दिली. त्यावरुन कोंढवा पोलिसांनी एकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १४ वर्षाच्या मुलीला त्रास होत असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणी करत असताना या मुलीला विश्वासात घेऊन तिच्याबरोबर कोणी वाईट कृत्य केले का याची विचारणा केली. यावेळी या मुलीने २०१७ मध्ये ते राहत असलेल्या शिवनेरीनगर येथे घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.
ही मुलगी तेव्हा १० वर्षाची होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एकाने पत्नीला त्रास होत असल्याचे सांगून या मुलीला घरात बोलावून घेतले. दरवाजा बंद केला. त्यानंतर स्वत:चा पायजमा काढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, असे तिने डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी तात्काळ ही बाबत कोंढवा पोलिसांना कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. या मुलीच्या आईची फिर्याद घेऊन पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील तपास करीत आहेत.