राजू इनामदारपुणे: महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर अभियंता शाम ढवळे यांनी आपल्या छंदाला स्वखर्चातून संग्रहालयाचे रूप दिले आहे. अनेक वर्षे ठिकठिकाणी भ्रमंती करून मिळवलेला खजिना 'कलामंडल' या संग्रहालयात प्रदर्शनीय झाला आहे.पौड गावाच्या अलिकडे दरवडे नावाचे गाव आहे. तिथल्या मिस्टिप वसाहतीच्या थोडे पुढे हे दुमजली कलामंडल उभे राहिले आहे. जमीन ढवळे यांच्याच मालकीची, सेवेत असताना केलेली बचत, निवृत्त होताना मिळालेले काही वेतन खर्च करून ढवळे यांनी ही स्वप्नपुर्ती केली आहे. ५ गुंठे जागेवर बांधकाम केले आहे. तिथे पुण्यातल्या जुन्या वाड्यांमधील लाकडी कोरीव कामांच्या खिडक्यांपासून ते कसबा पेठेतील पेशवाईतल्या घरांच्या जोत्याच्या दगडांसह अनेकविध वस्तू मांडून ठेवल्या आहेत. त्यातल्या बहुतेक ढवळे यांनी स्वतः फिरून जमवलेल्या आहेत, तर काही त्यांना भेट म्हणून मिळालेल्या आहेत.महापालिकेच्या बांधकाम विभागात काम करत असले तरी ढवळे मनाने पुराणवास्तू आणि इतिहासकालिन वस्तूंमध्येच रमलेले असायचे. ते स्वतः उत्तम चित्रकार, शिल्पकार आहेत. त्यामुळे नजर जाणकार आहे. सेवेत असतानाच त्यांनी दीर्घ रजा घेऊन डेक्कन कॉलेजमधून आर्किओलॉजी आणि टिळक विद्यापीठातून हेरिटेज मॅनेजमेंट हे दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केले. सुदैवाने त्यांना पालिकेच्या हेरिटेज सेलचे प्रमुखपद मिळाले. त्यातूनच त्यांनी मग नानावाडा, विश्रामबाग वाडा, लाल महाल यांना त्यांचे जुने वैभव मिळवून दिले. महात्मा फुले मंडईची आठ पाकळ्यांची वास्तू ही त्यांंनी मजबूत केली. सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिराचाही जिर्णोद्धार केला.ही कामे करत असतानाच त्यांनी जुन्या वस्तू जमा करण्याचा आपला छंद जोपासला होताच. लाकडी कोरीव कामाचे असंख्य नमुने यात आहेत. आळंदी रस्त्यावर सापडलेले दगडी रांजण आहेत. जुन्या खिडक्या, दरवाजे, टेबल आहेत. फोन, रेडिओ याचाही यात समावेश आहे. राहत्या घरात या वस्तू ठेवणे अवघड होऊ लागल्याने त्यांनी हे कलामंडल उभे केले आहे. कोरोनाच्या आधीपासून ते याची उभारणी करत होते. आताच्या वस्तूंबरोबरच भविष्यात हा संग्रह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आताच त्यांंनी दोन मजली इमारत बांधली आहे. स्वतः चित्रकार असल्याने मांडणी, सजावट त्यांचीच आहे. खिडक्या, दरवाजे त्यांनी अशा खुबीने बसवलेत की ते इमारतीचाच भाग वाटावेत. वस्तूंसाठी लागणाऱ्या बैठकाही त्यांनी स्वतः तयार केल्यात. भिंतींवर त्यांंनीच काढलेली आकर्षक चित्र आहेत. तुळशी वृंदावनापासूनच्या अनेकविध वस्तू संग्रहालयात आल्या आहेत. ढवळे म्हणाले, "वैयक्तिक असले तरी हे संग्रहालय सर्वांसाठी खुले ठेवणार आहे. मी जमा केलेल्या वस्तू असे नाही तर अन्य कोणालाही त्यांच्याकडे असलेल्या जून्या वस्तू इथे द्यायच्या असतील तर तशी मोकळीक आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख तिथे करण्यात येईल. थोडी कामे अद्याप बाकी आहेत. कोरोना टाळेबंदीमुळे ती करता आली नाहीत. लवकरच ती पूर्ण होतील व संग्रहालय सर्वांंना पाहता येईल."
निवृत्तीनंतर 'त्यांनी' उभे केले स्वखर्चातून 'कलामंडल'; छंदांचे संग्रहालयात रुपांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 12:05 PM
अवलिया व स्वच्छंदी माणसांना निवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्नच पडत नाही.. !
ठळक मुद्देवैयक्तिक असले तरी हे संग्रहालय सर्वांसाठी खुले ठेवणार