किरण शिंदे
पुणे - मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेले वाहन तोडफोडीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. वाहन तोडफडीच्या घटना थांबवण्यासाठी पोलीस उपाययोजना राबवत असताना पुणे शहरातील सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिलारेवाडीतील ओम साई निवास येथील वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये दोन चार चाकी, एक रिक्षा, दोन दुचाकी आणि एक टँकर अशा वाहनांचे नुकसान झाले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही रविवारी सायंकाळी अल्पवयीन टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. धनकवडी येथील चव्हाण नगर परिसरातील शांतीनगर वसाहतीत दुचाकीवरून आलेल्या टोक यांनी लाकडी दांडक्याने आणि दगडाने पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
काही दिवसांपूर्वी सहकार नगर परिसरात तब्बल 26 गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून मोका लावला होता. मात्र तोडफोडीसारखे प्रकरण घडल्याने वारजे आणि सहकार नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलली होती. मात्र असे असतानाही झोन दोनच्या हद्दीतील वाहनांची तोडफोड काही थांबताना दिसत नाही.