केडगाव - केडगाव (ता. दौंड) परिसरातील दोन जैन समाजाच्या महिलांनी आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान करून आदर्श घालून दिला आहे. यामध्ये कुसुम शांतीलाल शेलोत (वय ७२, रा. केडगाव ता. दौंड) तसेच कुसुम कांतीलाल सावज (वय ७५, रा. वरवंड, ता. दौंड) यांचा समावेश आहे. यापैकी केडगाव येथील कुसुम शेलोत यांनी मृत्यूपूर्वी इच्छापत्र लिहिले होते. यामध्ये मृत्यपश्चात कोणते क्रियाकर्म करावे, याबाबत इच्छा व्यक्त केली होती. यामध्ये शिरावत, काजळकुंकूव तेरावा करू नका, उठावणा साध्या पद्धतीने करा, अस्थिविसर्जन नदी व नाल्यामध्ये न करता निर्जन स्थळी करा. सर्व खर्च गरीब,अनाथ व गरजू मुलांसाठी करा, असे आवाहन त्यांनी केले होते. मृत्यूपश्चात त्यांच्या इच्छापत्राचे आम्ही पालन केले. गरजुंना मदत केली, असे मत त्यांचा मुलगा संतोष शेलोत यांनी व्यक्त केले. केडगाव परिसरातील ‘एक मित्र एक वृक्ष’ या संघटनेचे प्रमुख प्रशांत मुथ्था यांनी गेल्या महिन्यात नेत्रदान जनजागृती व्याख्यानात नेत्रदानाचे आवाहन केले होते.त्यानुसार या दोन्ही कुटुंबीयांनी नेत्रदान केले. नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रेमकुमार भट्टड यांनी नेत्रदान प्रक्रिया पूर्ण केली.
मृत्यूनंतरही त्या पाहताहेत जग, केडगावच्या दोन महिलांचे नेत्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:19 AM