बारामतीचा निकाल पाहून अजित पवार म्हणाले...; आता काय कपाळ फोडावं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 05:42 PM2023-09-09T17:42:29+5:302023-09-09T17:57:11+5:30
पुण्यातील अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते
पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमात बारामती तालुक्यातील निकाल वाचताना नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या ५ वी आणि ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुण वाचून दाखवताना ज्या तालुक्यातील निकाल शुन्य टक्के लागला आहे. त्या तालुक्यातील शिक्षकांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांचे कान टोचले. यावेली, बारामती आणि हवेली तालुक्यातील कामगिरीवरही भाष्य केलं. हवेतील शिक्षक बदल्यांसाठी सारखं येतात, पण विद्यार्थ्यांचा निकाल हा असा, असे म्हणत त्यांनी स्पष्टपणे भाष्य केलं.
पुण्यातील अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, रणजित शिवतारे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जिल्हा परिषद शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल मी गायकवाडकडून विचारत होतो. त्यावेळी, त्यांनी सांगितलं, १९-२०,२०-२१,२१-२२ या कालावधीतील देखील निकाल माझ्यासमोर आहेत. इयत्ता ५ वीचा यंदाचा आणि गतवर्षीचा निकाल साधारण सारखाच लागलेला आहे. गेल्यावर्षी ६४० विद्यार्थी-विद्यार्थींनी गुणवत्ताधारक म्हणून आले होते, यंदाही ६४० च आलेले आहेत. तर, आठवीचे गेल्यावर्षी ७० होते, यंदा ८३ आले आहेत. दरम्यान, गेल्या ४ वर्षांतील निकाल पाहिला असता, यंदा सर्वात चांगला निकाल लागलेला आहे. त्यामुळे, सर्वच शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थींनींचं मी कौतुक करतो, असे म्हणत अजित पवार यांनी शिष्यवृत्ती निकालाची माहिती दिली.
पुणे जिल्ह्यात शिष्यवृत्ती निकाल जरी चांगला लागला असली तरी काही तालुके मागे राहिले आहेत. आपल्या १३ तालुक्यात ८ वीचे ८३ विद्यार्थी गुणवत्ताधारक झाले, त्यात सर्वाधिक शिरुर तालुक्यातील आहेत. ८३ पैकी ४२ विद्यार्थी शिरुर तालुक्यातील आहेत. आंबेगाव तालुक्याचे १५ आले, तिसरा खेड १४, चौथा मुळशी तालुका ५, मावळ तालुक्यात ४ विद्यार्थी आले आणि वेल्हा तालुक्याचे ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. तर, शून्य निकाल बारामतीचा लागला, आता काय कपाळ फोडावं, असे म्हणत अजित पवारांनी बारामतीच्या निकालावर थेट नाराजी व्यक्त केली.
आमची लोकं काय करतात, आम्ही मर-मर सकाळी ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. शिरुरचे माझे शिक्षक, शिक्षिका आणि स्टाफ यश मिळवू शकतो. आंबेगाव, खेडचा मिळवू शकतो अन् आम्ही शून्य, असे म्हणत अजित पवार यांनी बारामती शिष्यवृत्ती निकालावर थेट नाराजी व्यक्त केली. दौंड शून्य, हवेली शून्य, द्या हवेलीत तर सगळ्या शिक्षकांना बदल्या पाहिजे असतात. दादा हवेली द्या, दादा पुण्याच्याजवळ द्या, असे म्हणत अजित पवार यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेवरच थेट सवाल उपस्थित केला. आपल्या तालुक्यातील निकाल शुन्य ही बाब समाधानकारक नाही, असेही अजित पवार म्हणाले.