पुणे: जुन्नर वन विभागाने शिवनेरी किल्ल्यावर प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानंतर आता किल्ले सिंहगडावर देखील ५ जून पासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार असल्याचे नियोजन वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. याविषयी ‘लोकमत’ने शिवनेरीवर बंदी झाली आता सिंहगडावर कधी ? असे वृत्त दिले होते. त्यानंतर वन विभागाने सिंहगडासाठी पाऊले उचलली आहेत.
गडकिल्ल्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर फिरायला जातात. सिंहगड तर पुणेकरांचा खास किल्ला आहे. शनिवार-रविवारी तिथे प्रचंड गर्दी होते. तसेच प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्याही पहायला मिळतात. हा कचरा इतरत्र पडल्याने गडाचे पावित्र्य धोक्यात येते. त्यावर आता वन विभाग योग्य पावले उचलण्याचे नियोजन करत आहे. शिवनेरी किल्ल्यावर पहिल्यांदा प्लास्टिक बंदी लागू झाली. तिथे गेल्या आठवड्यापासून त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तिथे हा निर्णय लागू होण्यापूर्वी गडावर शुध्द पाण्याची सोय करण्यात आली हाेती. त्यामुळे त्यांना निर्णय घेतल्यानंतर कसलाही त्रास झाला नाही.
आता सिंहगडावर देखील पुरेशा शुध्द पाण्याची सोय करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच असा निर्णय घेणे योग्य ठरणार आहे. त्याबाबतीत वन विभागाने नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे पुणेकरांनी देखील आता गडावर जाताना सोबत प्लास्टिकची बाटली न ठेवता स्टिलची ठेवावी किंवा गडावरील पाण्यावर आपली तहान भागवावी. कारण पायथ्यावरच ५ जून पासून प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू होणार आहे. तेव्हा प्लास्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणी देऊन मगच गडावर जावे लागणार आहे. हा अतिशय स्तुत्य निर्णय असल्याची भावना गडप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
किल्ले सिंहगडावर आम्ही ५ जून पासून प्लास्टिक बंदी करण्याचे नियोजन करत आहोत. सध्या गडावर कचरा स्वच्छता मोहिम सुरू आहे. ती आम्ही नेहमीच करत असतो. पण आता ५ जून रोजी पर्यावरणदिन आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचे नियोजन करण्यात येत आहे. - प्रदीप संकपाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी, वन विभाग, पुणे