प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे स्थानकांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आता पुणे स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल ), लोहमार्ग पोलीस व स्थानिक पोलीस हे एकत्रितरीत्या लवकरच पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुरक्षा आढावा घेऊन त्या विषयाच्या उपाययोजना मांडणार आहे. मात्र, रेल्वेचा हा निर्णय म्हणजे वरातीमागून घोडे, असाच प्रकार म्हणावे लागेल.
गेल्या काही दिवसांपासून पुणे स्थानकावर सातत्याने गुन्हे घडत आहे. यात रिक्षाचालकांच्या गुंडगिरीपासून ते महिला प्रवासी, कर्मचारीच्या सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर स्थानकावरील कार्यालयात अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर, सर्वच यंत्रणा आता खडबडून जागी झाली. त्यामुळेच पहिल्यांदाच आता स्थानकाचे प्रवासी सुरक्षा दृष्टीने ऑडिट केले जात आहे.
बॉक्स १
स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरांची संख्या तोकडी :
पुणे स्थानकावर गर्दीच्या काळात जवळपास लाख ते दीड लाख प्रवासी रोज येतात आणि जातात. मात्र, त्यावर नजर ठेवण्यासाठी केवळ ६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. यात सर्व फलाटदेखील दिसत नाही. ही संख्या खूप तोकडी पडते. किमान आणखी १५० कॅमेरांची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे आधी दुर्लक्ष केले. आता तरी कॅमेरांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
बॉक्स २
तर स्थानकांवरील रिक्षा जप्त :
मंगळवारी पुणे लोहमार्ग पोलिसांकडे आरपीएफ, शहर वाहतूक पोलीस, रिक्षाचालकांची संयुक्त बैठक झाली. यात पुणे स्थानकावर येणाऱ्या रिक्षाचालकांकडे जर परमिट, परवाना, बॅच, गणवेश नसेल तर त्यांची रिक्षा जप्त केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारपासून ही कारवाई सुरू करणार असल्याचे लोहमार्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांनी सांगितले.
कोट :
पुण स्थानकावरील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता आता पुणे रेल्वे स्थानकांचे आम्ही सुरक्षा ऑडिट करणार आहोत. प्रवासी सुरक्षा अधिक चांगली व्हावी यासाठी उपाययोजना आखल्या जातील.
उदय पवार, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, पुणे