पुणे : बारामती मतदार संघातील सहा तालुक्यातील विद्यार्थीनींना 6 हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थीनींशी संवाद साधताना त्यांना माेठे झाल्यावर काय व्हायचे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारले, यावेळी मुळशी तालुक्यातील एक विद्यार्थीनी मला खासदार व्हायचंय असं म्हणाली. यावर दहा वर्षांनी तु माेठी झाल्यावर मी निवडणूक लढवणार नाही, तुला संधी देईल असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थीनीला लाेकसभेची ऑफर दिली. तसेच आत्ताच पवार साहेबांना तुझं नाव सांग म्हणजे ते तुला तिकीट देतील असा सल्लाही सुळे यांनी विद्यार्थीनीला दिला.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने बारामती तालुक्यातील विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी टाटा ट्रस्टचे तारापाेरा सुद्धा उपस्थित हाेते. शालेय विद्यार्थीनींना सहा हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला. मी कुठल्या भाषेत भाषण करु असा प्रश्न सुळे यांनी विद्यार्थीनींना विचारला यावेळी मराठी, इंग्रजी या भाषा विद्यार्थीनी सांगत असताना काही विद्यार्थीनी हिंदी म्हणाल्या, तेव्हा तुम्हाला लाेकसभा लढवायची आहे का म्हणून हिंदीत बाेला म्हणताय असा मिश्किल प्रश्न त्यांनी केल्यावर कार्यक्रमात एकच हशा पिकला. सुळे म्हणाल्या, बारामती मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत 25 हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. यातील 10 टक्के सायकल या आशा वर्करला देण्यात आल्या. टाटा ट्रस्टने सायकल उपलब्ध करुन दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानते, टाटा ट्रस्टने या मुलींच्या चेहऱ्यावर आनंद आणि आशावाद निर्माण केला आहे. प्रत्येक सायकल या गरजूंच्याच घरात गेल्या आहेत. माझा मतदारसंघ मला कुपाेषणमुक्त करायचा आहे. सध्या तीन टक्के भाग कुपाेषणमुक्त करायचा राहिला आहे, येत्या 2 वर्षात सगळा मतदारसंघ कुपाेषणमुक्त करणार आहे.
शरद पवार म्हणाले, सायकलींमुळे विद्यार्थीनींची शाळेतील उपस्थिती वाढली. तसेच विद्यार्थीनी नापास हाेण्याची संख्याही कमी झाली. पुढच्या वर्षी पासून गरजू मुलांना देखील सायकलींचे वाटप करण्यात यावे अशी सूचना ही पवारांनी यावेळी केली.