पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. शिवाजीनगर पोलिसांनी तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासून पसार ट्रकचालकाला पकडले.
ख्वाजामिया मस्तानमिया खान (२६, रा. बिदर, कर्नाटक) असे अटक ट्रकचालकाचे नाव आहे. गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महापालिका भवन परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार पृथ्वीराज विष्णुकुमार शेळके (२२, रा. पिंपरी) याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिसांना ट्रकचा वाहन क्रमांक मिळाला नव्हता. अंमलदार रणजित फडतरे यांनी महापालिका भवन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा अपघातानंतर ट्रकचालक गाडगीळ पुतळा परिसरातून कुंभारवेस चौकातून मालधक्का परिसरात गेल्याचे आढळून आले. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तेव्हा ट्रकचालक हैदराबादला गेल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, हैदराबादहून ट्रकचालक निघाला असून, तो मालधक्का परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ट्रकचालक खान याला मालधक्का परिसरात ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अपघाताची कबुली दिली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, अविनाश भिवरे, रणजीत फडतरे, बशीर सय्यद, गणपत वाळकोळी आदींनी ही कारवाई केली.