दीपक होमकर
पुणे : लग्नानंतर पाच वर्षांत पतीचा मृत्यू झाला. तोपर्यंत ओटीत तीन वर्षांची तान्हुली होती. ना सासू-सासरे, ना घर-दार. होती ती फक्त पतीची रिक्षा. पतीच्या निधनाने खचल्यामुळे तान्हुलीला घेऊन माहेरी करमाळ्याला (जि. सोलापूर) गेले. वर्षभर राहिल्यावर हिंमत एकवटून मुलीच्या भविष्यासाठी पुन्हा पुण्यात परतले आणि पतीच्या रिक्षाचे स्टेअरिंग हाती घेतले. दिवसभर रिक्षा चालविताना चार वर्षांच्या तान्हुलीला रिक्षाच्या डिक्कीत ठेवून भाडं करत होते, हे अनुभव सांगत हाेत्या पुण्यातील पहिल्या रिक्षाचालक, स्कूल व्हॅनचालक म्हणून गौरव असलेल्या सविता कुंभार.
मुलगी रडायला लागली की रिक्षा थांबवायची, तिला खाऊ घालायचे, तिची समजूत काढायची आणि पुन्हा रिक्षा हाकायची... असं करत आयुष्य काढलं. अशा कठीण स्थितीतही मुलीला इंटेरिअर डिझाइनचं पदवीचं शिक्षण दिलं. बजाज कंपनीत काम करणाऱ्या मुलाशी विवाह लावून दिला. तिचा उत्तम संसार याच डोळ्यांनी पाहते तेव्हा आयुष्य सार्थकी लागल्याची भावना निर्माण होते.
पतीच्या निधनानंतर पुण्यामध्ये रिक्षा चालवून आणि पुढे स्कूल व्हॅन चालवून त्यांनी पुण्यातील तमाम महिलांना रोजगाराचा नवा मार्ग तर दाखविलाच, शिवाय एकाकी महिलेची यशस्वी संघर्षगाथाही मांडली.
सविता यांचा १९९५ मध्ये संजय कुंभार यांच्याशी विवाह झाला होता. दोन वर्षांनंतर त्यांच्या संसाराच्या वेलीवर कळी फुलली. छोट्या घरामध्ये सुखी संसार सुरू असताना अचानक पतीचं निधन झालं आणि आभाळ कोसळलं. सारी स्वप्नं उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे खचून गेलेल्या सविता माहेरी गेल्या. वर्षभर तिथे राहिल्यावर करमाळ्यासारख्या छोट्या गावात रोजगाराच्या संधी खूप कमी असल्याचे त्यांचे लक्षात आले आणि पुण्यात पतीचीच रिक्षा चालवायचा निर्धार केला आणि त्या पुन्हा पुण्यात परतल्या.
सुरुवातीला वर्षभर शिवणकाम करत चरितार्थ चालविला. त्याच वेळी त्या रिक्षा चालवायला शिकत होत्या. रिक्षा चालविण्याचा परवाना मिळाल्यानंतर त्यांनी मग रिक्षाचे भाडे मारायला सुरुवात केली. त्यावेळी चार वर्षांच्या चिमुरडीला कुठे ठेवायचे, असा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी मुलीला डिक्कीत ठेवून रिक्षाचा प्रवास सुरू केला. सुमारे दोन-तीन वर्षे असा संघर्ष सुरू होता. त्यानंतर पुणे महापालिकेने महिलांना व्हॅन चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते, ते प्रशिक्षण घेऊन सविता यांनी कर्ज काढून स्वत:ची व्हॅन खरेदी केली आणि मग रिक्षातला प्रवास स्कूल व्हॅनमधून सुरू झाला. त्यावेळीही मुलगी बरोबर होतीच.
दर तीन-चार वर्षांनी त्यांनी एका व्हॅनचे चार व्हॅन केले आणि उत्तम व्यवसाय सांभाळत मुलीला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले आणि तिचे लग्नही लावून दिले. आज जावई-मुलगी आणि नात यांचा उत्तम संसार पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा रंग खुलला आहे. नवरात्रीच्या साडीच्या रंगापेक्षा हा कर्तृत्वाचा रंग अधिक गडद असल्याची भावना त्यांनी आवर्जून व्यक्त केली.
अधल्या मधल्या वेळेत स्वयंपाक आणि घरकाम
सकाळी साडेसहाला स्कूल व्हॅॅन घरातून बाहेर काढायची. सातच्या शाळेतील मुलांना सोडल्यावर साडेसात वाजता घरी घेऊन आठपर्यंत स्वयंपाक पाणी करायचे. पुन्हा आठ वाजता व्हॅन घेऊन साडेआठच्या शाळेतील मुलांना सोडायला बाहेर जायचे. त्यांना सोडून पुन्हा नऊला घरी यायचे. घर आवरायचे. पुन्हा साडेनऊला बाहेर पडायचे. या साऱ्या धावपळीत पाच वर्षांची चिमुरडी कायम सोबत असायची. हे काम खूप कष्टाने आणि मन लावून केल्याने व्हॅनमधील पालक माझ्यावर खूप समाधानी होते. त्यातील अनेक मुले आज डॉॅक्टर, इंजिनिअर झालेत. ते आवर्जून भेटायला येतात हीच मी कमावलेली श्रीमंती आहे.
- सविता कुंभार, व्हॅन चालक