इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वी इतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे ही भावना केवळ शब्दातून व्यक्त न करता खा.सुप्रिया सुळे यांनी पतीच्या निधनानंतर एकल झालेल्या झालेल्या सर्व महिलांच्या कपाळाला साक्षात सुप्रिया सुळे यांनी कुंकू लावले, अन् काही क्षणांसाठी वातावरण भारावून गेले. त्या महिला ही गहिवरल्या.
गुरुवारी गावभेट दौ-याच्या निमित्ताने खा.सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. नियोजित कार्यक्रम आटपतानाच पतीनिधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण व आशा अमोल पोळ या भगिनीनी त्यांची भेट घेतली. वैधव्याचे ठळक लक्षण असणारे प्रत्येकीचे विनाकुंकुवाचे कपाळ खा. सुळे यांच्या मनाला तीव्र देवून गेले. ठसठसणा-या अस्वस्थतेवर काबू ठेवत, त्यांनी पहिल्यांदा कुंकवाचा करंडा मागवला. प्रत्येकीच्या कपाळावर कुंकू रेखले. या वेळी बोलताना सुळे म्हणाल्या, समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. त्याच अधिकाराने पतीच्या निधनानंतर कोणत्या ही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागवले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही. एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी, अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.