पुणे : पुण्याला देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनवण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने कंबर कसली आहे. पालिकेने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्या अंर्तगत शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता दुभाजकाचे जेटींग मशिनद्वारे स्वच्छता करण्यात आली.
पुण्याला देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनवण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नुकताच मध्यप्रदेशातील इंदौर शहराचा दाैरा देखील केला. दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
यात सर्वप्रथम आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात त्यांना घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, वाहतूक नियोजन, कमर्शियल भागातील कचरा याबाबत केलेले सुयोग्य नियोजन आणि झाडण काम आदीबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर आता रस्त्यावरील दुभाजक जेंटींग मशिनच्या सहाय्याने स्वच्छ केली जाणार आहेत. त्याची सुरवात नुकतीच करण्यात आली आहे. त्या अंर्तगत शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता दुभाजकाचे जेटींग मशिन द्वारे स्वच्छता करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनचे उपायुक्त संदिप कदम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक धनवट आदी उपस्थित होते.
वॉकीटॉकी घेणार -
इंदूर महापालिकेने लोकांमध्ये जनजागृती केली. लोकांना कचऱ्यासंदर्भात चांगली सवय लावण्यासाठी कठोर उपाययोजना केली. महापालिकेचा कचरा विभाग आणि पोलिस यांच्या सहकार्याने कंट्रोल रूम तयार केली आहे. कचरा विभागातील कर्मचाऱ्यांना संपर्कासाठी वॉकी-टॉकीसारखी यंत्रणा दिली आहे. एखाद्या भागात कारवाईसाठी कचरा विभागाचे कर्मचारी गेले आणि तेथे त्यांना विरोध करण्यात आला तर ते कर्मचारी वॉकी-टॉकीवर संपर्क साधतात. त्यानंतर तत्काळ पोलिस आणि कचरा विभागाचे अधिकारी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी हजर हाेतात. त्यामुळे विरोध करणाऱ्या लोकांवर दबाव येतो. त्याचधर्तीवर पुणे महापालिका वॉकीटॉकी घेणार आहे.
प्रायोगिक तत्वावर चार गाड्या विकत घेणार
इंदूर महापालिकेची स्वत:ची लहान गाडी आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिका प्रायोगित तत्वावर चार गाडया विकत घेणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.