पुणे : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचवलेले शिवसृष्टी, बिबट्या सफारी आणि आता इंद्रायणी मेडिसिटी हा ड्रीम प्रकल्प देखील बारामती तालुक्यात हटविण्याच्या हालचाल सुरू झाल्या आहेत. मेडिसिटी सारखा ऐवढा महत्त्वाच्या प्रकल्पासाठी दीडशे नाही तर तब्बल तीनशे एकर जागा उपलब्ध करून द्या असा आग्रह आता खुद्द उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी धरला आहे. यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात तरी ऐवढी मोठी जागा उपलब्ध होणे कठीण असून, जिल्ह्यातील फक्त बारामती तालुक्यातच ऐवढी जागा सहज उपलब्ध होऊ शकते असा विश्वास आता अधिका-यांना वाटू लागला आहे.
पुणे जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी तीनशे एकर जागा लागणार आहे. ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीएकडे जबाबदारी देण्यात आली आहे. एवढी मोठी जागा या प्रकल्पासाठी कशी आणि कोठून उपलब्ध होणार याची विवंचना प्रशासनातील अधिकारी मध्ये असून बारामती पट्ट्यात अशी जागा उपलब्ध होऊ शकते असे मत अधिकारी वर्गातून व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी मुंबईत मंत्रालयात इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प संदर्भात बैठक झाली. या बैठकीला संबंधित विभागांचे सचिव आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे इतिवृत्त जिल्हा प्रशासनाकडे आले असून त्यामध्ये मेडिसिटी प्रकल्पासाठी तीनशे एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. मोशी आणि परिसरात तीनशे एकर जागा उपलब्ध होणे अवघड असल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शासनाच्या मालकीची अशी कोणती तीनशे एकर जागा या परिसरात उपलब्ध नाही त्यामुळे भूसंपादन करून एवढी मोठी जागा घ्यावयाची झाल्यास मेडिसिटी प्रकल्प एवढाच खर्च जागेवर करावा लागेल. असे मत अधिकारी वर्गातून व्यक्त होत आहे.
इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी आराखडा तयार करणे त्याची व्यवहार्यता तपासणे तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नोडल एजन्सी नेमले जाणार असून त्याची जबाबदारी पीएमआरडीए कडे देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणजेच एस पी व्ही कंपनी देखील स्थापन करण्यात येणार असून पीएमआरडी मार्फत या कंपनीची उभारणी करणे प्रस्तावित आहे.