बारामती: मी निवडणूक काळात दादांच्या सोबत होतो. हा माणूस कधी झोपायचा आणि कधी उठायचा काहीही कळत नव्हते. लोकसभा पराभवांतर कोणीही टिंगल करत होते. काहीही वावड्या उठवल्या गेल्या. मात्र हा माणूस कोणतीही प्रतिक्रिया न देता काम करत राहिला. १६ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या माणसांने घेतलेली मेहनत बघताना या अफाट माणसाच्या जिद्दीचे दर्शन झाले. जिंकणारी लढाई जिंकणे सोपे पण हरणारी लढाई जिंकण्याची किमया दादांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी पवार यांच्या विजयामागे असणारे परिश्रम अधोरेखित केले आहे.
मुसळे यांनी सोशल मिडीयावर केलेली हि पोस्ट चर्चेत आली आहे. मुसळे म्हणतात, वयाची पासष्ट वर्षे ओलांडली. सगळी संकटे, बदनामी चारी बाजूने आलेली. स्वकीय जास्त विरोध करत होते. लोकसभा निवडणुकीत पत्नीचा पराभव झालेला. राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याच्या चर्चा हितशत्रूनी सुरु केलेल्या. अजितदादा यांच्या सगळ्या वजाबाकीच्या बाजू वर उल्लेख केलेल्या अशा परिस्थितीत याही वयात या माणसाजवळ असलेली दुर्दम्य, इच्छाशक्ती आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी हे सगळं मला जवळून बघता आल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
निवडणूक काळात दादांनी एकूण ४८ सभा घेतल्या. या काळात विमानातून प्रवास करत असताना सोबत असायची, पिठलं भाकरीची शिदोरी आणि बहिणीनी प्रेमाने दिलेल्या चकल्या लाडू, हे आशीर्वाद त्यांच्या सोबत असत. दादांच्या वडिलांच्याबद्दल कोणाला फारशी माहिती नाही. त्यांना तात्यासाहेब म्हणायचे. ते पैलवान होते. शरद पवार साहेबांच्या राजकारणाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा राहिला. ते पैलवान होते. त्यांना चित्रपट क्षेत्राची आवड होती. व्ही शांताराम यांच्यासोबत त्यांनी काम केले होते.आजच्या संघर्ष आणि संकटाच्या काळात हा तात्यासाहेब यांचा मुलगा भारी ठरला आहे. या वयातही त्यांनी घेतलेले कष्ट पाहता, जे तरुण राजकारणात येऊ बघत आहेत त्यांच्यासाठी हे आदर्श घ्यावे असेच आहे. तरुणपणी एवढं कष्ट घेणे शक्य असते, पण याही वयात दादांनी दिलेली लढत आणि सोबत विश्वासाने आलेल्या आमदारांना मानाने सभागृहात घेऊन जाणे बघता महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पर्व सुरु झाल्याचा दावा मुसळे यांनी केला आहे.