पुणे : तुकडाबंदी, गुंठेवारी आणि रेरा कायद्याचे उल्लंघन करून बोगस दस्त नोंदणी करणाऱ्या पुणे शहरातील ४४ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र, बिबेवाडी येथील दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार असणारे कनिष्ठ लिपिक धम्मपाल मेश्राम हे निलंबित झाल्यानंतर देखील पदाचा कार्यभार आणि खुर्ची सोडत नव्हते. अखेर त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून सक्तीने पदावरून हटवावे लागले.
नोंदणी आणि मुद्रांक विभागात नोंदणी कार्यालयांमध्ये कार्यरत असणारे दुय्यम निबंधक आणि वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक नोंदणी महानिरीक्षकांचेही आदेश मानण्यास तयार नाहीत. डीपी वाडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कनिष्ठ लिपिक असतानाही दुय्यम निबंधकाचा पदभार असलेले धम्मपाल मेश्राम यांनी ६५२ बोगस दस्त नोंदणी केली. यामुळेच दोन दिवसांपूर्वी मेश्राम याला निलंबित करण्यात आले. निलंबनाचे आदेश त्यांना मुद्रांक जिल्हाधिकारी मार्फत बजावण्यात देखील आले. परंतु तरीही ते दुपारपर्यंत काम करीत होते.
धम्मपाल मेश्राम हे निलंबित होऊनही आणि आदेश बजावल्यानंतर देखील पदावर राहून काम करीत असल्याने मुद्रांक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समज दिली. तरीही ते कारवाईचा आदेश मान्य करण्यास राजी नव्हते. अखेर सक्तीने त्यांना निबंध पदावरून हटवावे लागले.
पुणे जिल्ह्यात तुकडेबंदी आणि रेरा कायद्याचे उल्लंघन करून सुमारे १०६६५ दस्त नोंदणी करण्यात आली. या प्रकरणात अकरा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करून त्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांचे कारवाईचे आदेश मानायला तयार नाहीत. आमच्यावर अन्याय झाला. हे संपूर्ण महाराष्ट्रातच हे घडले आहे. आम्ही प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये दाद मागू. आव्हानात्मक भाषा करून निबंधक पद सोडण्यास विरोध करीत आहेत.