वालचंदनगर : केंद्र्र शासनाने नोटाबंदी करून दोन महिने निघून गेले, तरीही बँकेच्या रांगा संपता संपेनात. आजही बँकेत दोन हजारांच्या वर रक्कम दिली जात नसल्यामुळे दोन महिन्यांनीसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे जवळजवळ २० गावांसाठी नॅशनल बँका फक्त वालचंदनगरमध्येच असल्याने सर्वच खेड्यांतील व वाड्यावस्त्यांतील नागरिकांची सकाळपासून तोबा गर्दी होत आहे. सकाळी आठपासून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागत आहे. प्रत्येकाला जास्तीत जास्त दोन हजार रुपये दिले जात असल्याने उद्या संक्रांतीच्याऐवजी शिमगा करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. वालचंदनगर बँकेतील खातेदारांचे एटीएम कार्ड एक्स्पायर झाले आहे. बँकेत वेळेत कार्ड न आल्याने खातेदारांना दररोज हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नाही. या नोटाबंदीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे.
दोन महिन्यांनंतरही बँकासमोरील रांगा कायम
By admin | Published: January 11, 2017 2:09 AM