पुणे: शहरात गेली दोन दिवस ढगाळ वातावरण दिसून येत आहे. गुरुवारी सकाळी ८ ते ११.३० या कालावधीत भारतात काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण तर इतर भागात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार होते. नागरिकांना ढगाळ वातावरण असूनही दीड तासाच्या प्रतिक्षेने सकाळी ९.२७ वाजता सूर्यग्रहण पाहायला मिळाले. नागरिकांनी जल्लोषात सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. बालगंधर्व पुलावर सकाळपासूनच सर्व नागरिकांनी गर्दी केली होती. यानिमित्त नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशनतर्फे सूर्यग्रहणासोबत चहापान आयोजित करण्यात आले होते. फाऊंडेशनच्या आयोजकांनी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य अशी खंडग्रास सुर्यग्रहणाची प्रतिकृती तयार केली होती. ढगाळ वातावरणात नागरिक सूर्य दिसण्याची वाट पाहत होते. पण आयोजकांनी पुढाकार घेऊन या प्रतिकृतीतून खंडग्रास सूर्यग्रहण दाखवले. नागरिकांना याबद्दल माहिती देत होते. सकाळी ८ वाजल्यापासून पुलावर नागरिक येऊ लागले. मात्र ढगाळ वातावरणाने सर्वांना सुर्यग्रहणाच्या आशेत ठेवले होते. त्यावेळी एका बाजूने नवनिर्मिती फाऊंडेशन प्रतिकृतीतून सूर्यग्रहण दाखवत होते. तर लहान मुले सूर्य दिसण्याची वाट पाहत होते. अनेकांनी हे पाहण्यासाठी चष्मेही घेऊन ठेवले. आशेवर असणाऱ्या नागरिकांना दीड तासाने सूर्यदर्शन झाले. खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. ९.२७ वाजता सूर्यग्रहण दिसले. त्यानंतर ११ वाजेपर्यंत वेगवेगळ्या सूर्याच्या आकारात सूर्यग्रहण दिसत होते. ...................................................................फाऊंडेशनच्या वतीने पालकनीती आणि शैक्षणिक संदर्भ अशी पुस्तके सूर्यसंदेश देणारी कागदी प्रतिकृती नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आली होती. साधना कुलकर्णी म्हणाल्या, पालकनीती या मासिकात सूर्यग्रहणाच्या माहितीबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर लेख देण्यात आले आहेत. शैक्षणिक संदभार्तून पशू, पक्षी आणि निसर्ग अशा विषयावर लेख देण्यात आले आहेत. ..........* सूर्यग्रहणाच्या वेळी परंपरागत अंधश्रद्धेवर मुलांची मते.
* सूर्यग्रहण बघून आल्यावर डोक्यावरून अंघोळ करावी. असे घरातील ज्येष्ठ लोक सांगत असतात. परंतु, सूर्यग्रहणात चंद्रामुळे सूर्याची सावली पृथ्वीवर पडते. त्याचा अंघोळीशी काही संबंध नाही.- आर्या श्रीश्रीमाळ
..................
* सूर्यग्रहणात पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात. ग्रहण बघून झाल्यावर काही खाऊ नये अशी अंधश्रद्धा आहे. पण आम्ही यावर विश्वास ठेवत नाही. शाळेत सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याबद्दल शिकवताना असे काही सांगितले जात नाही. - अथर्व पाटोळे