पुणे : अखेर समुपदेशनाने त्या दोघांमधील तंटा मिटला. विसंवादाची जागा संवादाने घेतली. शेवटी त्या चिमुरड्याकडे पाहत, त्याच्या भविष्यासाठी दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला; मात्र या एकत्र येण्याला दीड वर्षाचा काळ जाऊ द्यावा लागला. अटी-तटीच्या वेळेवर येऊन ठेपलेला त्यांचा संसार पुन्हा आनंदाने सुरू झाला. त्या मुलाला आईवडिलांचे प्रेम, एकत्र सहवास मिळणे आवश्यक असल्याचे समुपदेशनातून दोघांना पटवून देण्यात आल्यानंतर, आनंद आणि सविताचा (नावे बदलली आहेत) विचार बदलला.२७ मे २०१३ रोजी दोघांचा विवाह झाला. आनंद खासगी नोकरी करतो. सविता शासकीय सेवेत आहे. कामानिमित्ताने तिची वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली होत असते. दोघांना एक गोंडस बाळ आहे. घरगुती कारणावरून दोघांत वाद निर्माण झाले. वाद इतके टोकाला गेले की, त्यामुळे ते दोघे जानेवारी 2017 पासून विभक्त राहू लागले. मुलाचा ताबा सविताकडे होता. मे 2017 मध्ये तिने घटस्फोट मिळावा, यासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर तिने आनंदला बाळास भेटू देण्यास विरोध केला. त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यात आले. त्या वेळी तिने त्याला बाळास भेटण्यास परवानगी दिली. दरम्यान, कौटुंबिक न्यायालयात दाखल दाव्याच्या तारखा पडू लागल्या; मात्र नोकरी करत असल्याने हजर राहण्यास दोघांना जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकत्र येत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला.दोघेही कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात २१ ऑगस्ट २०१८ ला हजर राहिले. त्या वेळी या केसमध्ये समुपदेशन केल्यास दोघे पुन्हा एकत्रित राहू शकता, असे अभ्यास केल्यानंतर काफरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आणि विवाह समुपदेशक विद्या चव्हाण यांनी दोघांचे समुपदेशन केले. याविषयी दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गणेश कवडे म्हणाले की, कौटुंबिक न्यायालय केवळ घटस्फोट देणारे नाही. तर कित्येक वेळेला मोडकळीस आलेली नाती इथे पुन्हा जोडली जातात. याचेच हे उदाहरण आहे. या घटनेतील यशस्वी समुपदेशनामुळे बाळाला आईवडिलांचा एकत्र सहवास मिळणार आहे.
चिमुरड्याच्या भविष्याचा विचार करून दीड वर्षानंतर संसार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 8:02 PM
त्या मुलाला आईवडिलांचे प्रेम, एकत्र सहवास मिळणे आवश्यक असल्याचे समुपदेशनातून दोघांना पटवून देण्यात आल्यानंतर, आनंद आणि सविताचा (नावे बदलली आहेत) विचार बदलला.
ठळक मुद्देसमुपदेशनाने सोडविला प्रश्न : संसाराची घडी पुन्हा सुस्थितीत