पुणे : घड्याळ कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून ५ हजार रुपये भरल्यास तुम्हाला लॅपटॉप फ्रीमध्ये मिळेल, या सांगण्याचा मोह न आवरल्याने एका तरुणाला तब्बल १ लाख ३४ हजार रुपये गमविण्याची पाळी आली.याबाबत उंड्री येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांना २१ मार्च २०२१ रोजी मोबाईलवर फोन आला. गो नॉईज या घड्याळाच्या कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. कंपनीची एक ऑफर चालू आहे. त्यामध्ये तुम्ही ५ हजार रुपये भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एक लॅपटॉप फ्री मिळेल, असे सांगितले. फिर्यादीकडून पेटीएम द्वारे तसेच आयसीआयसीआय बँकेचे अॅपद्वारे एक प्रोसेस करण्यास सांगितले. व त्यातून फिर्यादी यांच्या खात्यातून १ लाख ३४ हजार ६४६ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.