प्रशांत बिडवे, लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षण आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी पवित्र पाेर्टलवर रीक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात अशी सूचना झेडपीच्या सीईओंना केली हाेती. मात्र, विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात बिंदुनामावलीतील दुरूस्तीबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. त्या संदर्भात कारवाई करणे आवश्यक आहे. आता पवित्र पाेर्टलवर जाहिरात देताना ८० ऐवजी ७० टक्के रीक्त पदांची मागणी करावी अशी नव्याने सुचना दि. १९ राेजी शिक्षण आयुक्तांनी सीईओंना केली आहे. त्यामुळे यापूर्वीच अनेक महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षकभरतीमध्ये आता पुन्हा दहा टक्के जागा कमी भरल्या जाणार असल्याने निर्णयाविराेधात उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
जून २०२३ मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिक्षकांच्या रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास दिलेल्या परवानगीनुसार सर्व भरावयाची आहेत. मात्र, बिंदुनामावली संदर्भात काही वैध आक्षेप किंवा तक्रारी प्राप्त असल्यास त्यांचे निराकरण केले जाईल आणि त्यानंतर शासनाच्या परवानगीनुसार उर्वरित १० टक्के रिक्त पदे भरतीची कार्यवाही करण्यात यावी असेही आयुक्तांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे.
शिक्षण भरती प्रक्रियेत बिंदुनामावली तपासण्याची कार्यवाही सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, संघटना, उमेदवार यांच्याकडून विविध स्तरावर बिंदुनामावली अचूक करण्याबाबत त्रुटी दूर करण्याबाबत निवेदने प्राप्त झालेली होती. सदरची निवेदने व कार्यरत शिक्षकांचे सेवाविषयक अभिलेख पडताळून बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. यासाठी सुमारे ६ महिन्यांचा कालावधी लागला. सद्यःस्थितीत बिंदूनामावलीची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचेही शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी पत्रात सांगितले आहे.
शिक्षकांची सर्व रीक्त पदे तातडीने भरण्याबाबत राज्यशासन सकारात्मक नाही. रीक्त असलेल्या जागांपैकी ऐंशी टक्के जागा भरल्या जाणार हाेत्या. त्यात पुन्हा दहा टक्के पदे कमी भरली जाणार आहेत. या निर्णयामुळे सर्व प्रवर्गातील उमेदवारांचे नुकसान हाेणार आहे.-संताेष मगर, अध्यक्ष, डी.टी.एड, बी.एड. स्टुडंट असाेशिएशन