पुणे : गेले काही दिवस जवळपास रोज येत असणाऱ्या पावसाने सोमवारीही पुण्याला झोडपून काढले. मात्र पुणे शहर प्रशासनाने यातून काहीही धडा न घेतल्याने आजही बहुतांश रस्त्यांवर पाणी आणि त्यातून कसेबसे वाट काढणारे, जीव मुठीत धरून जाणारे पुणेकर बघायला मिळत आहेत. साेसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण दिवाळी पावसात गेल्यानंतर आता हिवाळ्यातही पाऊस पुणेकरांची पाठ साेडायला तयार नाही.
संध्याकाळी 6 च्या सुमारास शहरातील पूर्व भागातील उपनगरांमध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली. विमाननगर, वडगावशेरी, वाघाेली, धानाेरी या भागांमध्ये मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्याचबराेबर बिबवेवाडी, काेंढवा परिसरातदेखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पश्चिम उपनगरांमध्ये देखील जाेरदार पाऊस काेसळत आहे. वारजे- माळवाडी, कर्वेनगर, काेथरुड या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस काेसळत आहे.जुलैमध्ये सुरु झालेला पाऊस यंदा थांबण्याचे नाव घेत नाहीये. नाेव्हेंबर महिना सुरु झाला असला तरी पाऊस अद्याप परत गेलेला नाही. सप्टेंबर अखेर पुण्यात झालेल्या पावसाने 20 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला हाेता. ऑक्टाेबरमध्ये देखील शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी काेसळत राहिल्या. आता नाेव्हेंबरमध्ये देखील शहरात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या आणि परवा (दि. ५ व ६) रोजीही पुणे शहरात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे मागील आठवड्याप्रमाणे हा आठवडादेखील पुणेकरांसाठी पावसाने भिजवणारा असेल.