पुणे : एसटी पळवून नेऊन अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला संतोष माने याची आठवण व्हावी, अशी घटना बुधवारी सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहासमोर नागरिकांनी अनुभवली़ एका ट्रकने पार्क केलेल्या मोटारीसह ५ दुचाकी वाहनांना धडक दिली़ त्यात एका तरुणीसह तिघे जखमी झाले़ याप्रकरणी ट्रकचालक व एका हमालाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे़ ट्रकचालक दत्तात्रय आनंदराव फडतरे (वय ४५, रा़ ससाणेनगर) आणि हमाल बापू राजू काळे (वय २५, रा़ गंगानगर, फुरसुंगी) अशी त्यांची नावे आहेत़ या प्रकरणी श्वेता दर्शन रावल (वय ३४, रा़ बोट क्लब रोड) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की दत्तात्रय फडतरे यांनी दुपारी साडेचारच्या सुमारास एका टेम्पोच्या मागे ट्रक पार्क केला होता; पण किल्ली तशीच ठेवली होती़ बापू काळे याने हा ट्रक सुरू केला़ त्यात त्याचा पाय अॅक्सिलेटरवर पडला़ त्याबरोबर ट्रक वेगाने पुढे निघाला़ टेम्पोला धडक देऊन त्याने शेजारी पार्क केलेल्या २ दुचाकींना धडक दिली़ त्यात तरुणीसह तीन जण जखमी झाले़ त्यानंतर पुढे जाऊन ट्रकने आणखी ४ दुचाकींना धडक दिली़ एका मोटारीला धडक देऊन तिला तसेच रेटत ट्रक पुढे कचराकुंडीला धडकून थांबला़ या प्रकाराने घाबरलेल्या नागरिकांनी काळे याला बाहेर ओढून मारहाण केली़ ही घटना विश्रामबाग पोलिसांना समजताच ते तातडीने घटनास्थळी धावले़ त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले़ या घटनेमुळे पुणे पूर्वी शहरात खळबळ माजविणाऱ्या संतोष मानेची आठवण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले़ (प्रतिनिधी)- ट्रकच्या धडकेने टेम्पो, मोटार व ५ दुचाकी वाहनांचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़
पुन्हा ‘संतोष माने’
By admin | Published: June 16, 2016 4:02 AM