पुणो : विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या तापमानात थोडी घट होऊन थंडीच्या आगमनाची चाहूल लागत असतानाच राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट घोंगावू लागले आहे. त्यामुळे थंडी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत. पुढील 2 ते 3 दिवसांत ते तीव्र होण्याची शक्यता असल्याने राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी विदर्भ आणि मराठवाडय़ाचे किमान तापमान सरासरीच्या खाली होते. तर मध्य महाराष्ट्रातील काही शहरांचेही कमाल तापमान सरासरीच्या खाली गेले होते. मंगळवारी राज्यात सर्वात कमी 11.2 अंश सेल्सिअस तापमान गोंदियामध्ये नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा तब्बल 4.9 अंशांनी घटले होते. त्यापाठोपाठ नागपूरचे तापमान 11.7 अंश, वध्र्याचे तापमान 13.2, यवतमाळचे तापमान 13.4, उस्मानाबदचे तापमान 13.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पुण्याचे तापमान सरासरीपेक्षा अधिकच
पुण्याचे कमाल आणि किमान तापमान मंगळवारीही सरासरीहून अधिकच होते. मात्र रात्रीचे तापमान 14.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे रात्री हवेतील गारवा थोडा वाढल्याचे चित्र होते. मात्र पुढील 48 तासांत शहरात ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता पुणो वेधशाळेने वर्तविली आहे.