पुणे : त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते़ पण मुलाचे वय मुलीपेक्षा कमी होते. मुलाच्या वडिलांची लग्नाला संमती होती़ पण मुलीच्या पालकांनी नकार दिल्याने मुलीने आत्महत्या केली़. तेव्हा तिच्या पालकांनी मुलगा व तिच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल केला. आता हा गुन्हा मागे घेण्यासाठी ५ लाख रुपये द्या़ नाही तर खडी फोडायला जेलमध्ये पाठवू अशी धमकी देऊ लागले. या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या केली.तेव्हा आता मुलाच्या वडिलांनी मुलीचे आईवडिल, भाऊ, चुलत्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हवेली तालुक्यातील बहुली गावातील ही ट्राजेडी सर्वांनाचेच मन हेलावून टाकणारी आहे.
उत्तमनगर पोलिसांनी दिलीप पंढरीनाथ कांबळे (वय ५८, रा़ बहुली, ता़ हवेली) यांच्या फिर्यादीवरुन नथू लक्ष्मण भगत, पुष्पा नथू भगत, अविनाश नथू भगत, हरिभाऊ लक्ष्मण भगत, दिनकर लक्ष्मण भगत, मारुती लक्ष्मण भगत (सर्व रा़ बहुली, ता़ हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, दिलीप कांबळे यांचा मुलगा आनंता व नथू भगत यांची मुलगी अमृता यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यावेळी अमृता हिचे वय २१ आणि आनंता याचे वय १८ वर्षे होते. त्यांच्या प्रेमाची दिलीप कांबळे यांना माहिती झाल्यावर त्यांनी ते भगत यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा भगत यांनी या लग्नाला नकार दिला. त्यामुळे २०१३ मध्ये अमृता हिने पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. त्यामुळे भगत यांनी दिलीप कांबळे, आनंता व इतरांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी भगत यांनी ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. ५ लाख रुपये दिले नाही तर सर्व घरातील लोकांना जेलमध्ये खडी फोडायला पाठवतो़ असे म्हणत गावातील सार्वजनिक कार्यक्रमात कांबळे मुलासह गेले असताना त्यांनी शिवीगाळ करुन धमकी देऊन त्रास दिला. या त्रासाला कंटाळून आनंता याने ७ डिसेंबर रोजी राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर कांबळे यांनी धार्मिक विधी केल्यानंतर शनिवारी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली़ त्यानुसार नथू भगत व त्यांच्या नातेवाईकांवर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक के के कांबळे अधिक तपास करीत आहेत.