बारामती : शहरातील कचेरीच्या आवारात शिधापत्रिकेचा बाजार मांडल्याचे चित्र आहे. शिधापत्रिकेसाठी आवश्यक असणाऱ्या शुल्कापैकी २०० ते २५० पट शुल्क एजंटांकडून लुटले जात असल्याचे चित्र आहे. मनमानीपणे पैसे घेऊनदेखील हेलपाटे मारण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. गंभीर आजार असलेल्या महिलेवर शिधापत्रिकेअभावी उपचारापासून दूर राहण्याची वेळ आली आहे.बारामती कचेरीच्या आवारात एका महिलेने याबाबत ‘लोकमत’शी बोलताना तिची व्यथा मांडली. अहिल्याबाई चव्हाण असे या महिलेचे नाव आहे. या महिलेला तिच्या छातीला गंभीर गाठ आली आहे. या गाठीच्या उपचारासाठी महिलेला शिधापत्रिकेची आवश्यकता आहे. त्यामुळे तिच्या आजारावरील उपचार खोळंबले आहेत. माळेगाव येथील या महिलेने या परिसरात बसणाऱ्या एजंटाला शिधापत्रिकेसाठी चक्क ३ हजार रुपये दिले आहेत. एवढे पैसे मोजूनदेखील ‘साहेबांची सही झाली नाही ’ असे तिला त्या एजंटकडून सांगण्यात येत आहे. सोमवारीदेखील ती हताशपणे बसून होती. (प्रतिनिधी)‘मी अडाणीबाई हाय, मालक न्हाय, एकच मुलगी हाये, तिच बी लग्न झालय. छातीवर गाठ उठलीय.. शिधा पत्रिकेचा सही शिक्का बघून डॉक्टर गाठ काढणार हाये. आता रेशनकार्डसाठी आॅपरेशन रखडले, सही शिक्क्यासाठी अडकलंय बघा.- अहिल्याबाई चव्हाण
एजंटाने शिधापत्रिकेच्या २५० पट केले शुल्क वसूल
By admin | Published: September 13, 2016 1:24 AM