पुणे : दिवाळीमुळे एसटी बसेसना गर्दी वाढत आहे. सध्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास तसेच महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलत देणारी “महिला सन्मान योजना' अशा सवलतींच्या अनेक योजना सुरू केल्याने एसटीला चांगला महसूल मिळाला आहे. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची ही संख्येत वाढ होत आहे.खासगी वाहनचालकांचा व्यवसायही जोरात वाढला आहे. स्वारगेट ,शिवाजीनगर बसस्थानकात घुसून प्रवासी नेले जातात. या एजंटांवर एसटी महामंडळाकडून काहीच कारवाई होत नाही.
एस. टी. बसस्थानकात पोलिस चौकी, एसटीचे सुरक्षारक्षक असतानाही प्रवासी पळविण्याचे प्रकार थांबत नाहीत. खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट आणि खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक आणि एजंट सर्रास बसस्थानकातून प्रवाशांची पळवापळवी करत असतात, असे चित्र बसस्थानकात पाहायला मिळत आहे. अशा एजंटवर कठोर कारवाई केली पाहिजे. याठिकाणी सीसीटीव्ही द्वारे असा एजंटाना पकडून कारावाई केली पाहिजे.
एजंटांवर कारवाई का होत नाही?
स्वारगेट , शिवाजीनगर या मध्यवर्ती बसस्थानकातून व बसस्थानकाच्या आवारातून एसटीच्या प्रवाशांना खासगी बसचे एजंट पळवून नेतात. खासगी एजंटांचा बंदोबस्त करण्यास एसटी कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षकही अपयशी ठरत आहेत. या दलालांना धाकच नसल्याने ते थेट बसस्थानकात घुसून प्रवाशांची पळवापळवी करत आहेत. एसटीने जाणाऱ्या प्रवाशांना अवैध वाहतुकीकडे ओढण्यासाठी दलालांकडून आमिषेही दाखविली जातात. स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक येथून हजारो प्रवाशी पळवले जात आहेत. याकडे एसटी प्रशासनाने व पोलिसांनी कारवाई करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.
दिवाळीच्या काळात स्वारगेट बस स्थानक येथे गर्दी असते. यामुळे एजंट बसस्थानकात येऊन प्रवाशांनी घेऊन जातात. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिस स्टेशनला निवेदन दिलेले असते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवलेला असतो. त्यानुसार एजंटवर कारवाई केली जाते. - भूषण सूर्यवंशी, आगारप्रमुख