-विवेक भुसे
पुणे : सरकारी कार्यालयात काही काम असेल, तर लोक जाण्याचे टाळतात. कारण आपले काम पैसे दिल्याशिवाय होणार नाही, ही लोकांची मानसिकता तेथे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तयार केली आहे. त्यातूनच अशा कार्यालयात खासगी एजंटचा सुळसुळाट झाल्याचे आढळून येते. त्यात सर्वाधिक खासगी एजंटांचा सुळसुळाट महसूल विभागामध्ये दिसून येतो. गेल्या तीन वर्षात पुणे विभागात तब्बल ५६ खासगी एजंटांमार्फत लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. त्याखालोखाल पोलीस विभागात २३ खासगी व्यक्तींना लाच घेताना पकडले आहे.
महसूल विभागात कोणतेही काम सरळ होत नाही. नियम, कायदे याचे भंडोळे तेथील अधिकारी, कर्मचारी तुमच्या अंगावर जणू फेकतात. त्यातूनच खासगी एजंटाच्यामार्फत लाच घेण्याचे प्रकार येथे अधिक आढळून येतात. काम होत असल्याने नागरिक नाइलाजाने लाच देऊन काम करून घेतात. पण त्यालाही विरोध करणारे काही पुढे येतात. ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार करतात. अशा तक्रारीचे प्रमाण पुणे विभागात सर्वाधिक आहे. याचाच दुसरा अर्थ लाचखोरीबद्दल पुण्यात चीड असल्याचे दिसून येते.
महसूल विभागात अनेक किचकट नियम असतात, हे सर्व सामान्यांच्या आकलनाच्या पलीकडे असतात. अगदी कोणी २ - ४ गुंठा जमीन घेतली व तिची नोंद ७/१२ उतारावर करायची म्हटले तरी त्याला लाच द्यावी लागते. अशा प्रकारे लाच मागणाऱ्या अनेक तलाठी, सर्कल अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
दुय्यम निबंधक कार्यालये एजंटांच्या विळक्यात
शहरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालये ही तर एजंटांची कुरणे झाली आहेत. तेथे दस्त तयार करण्याचे काम खासगी लोकांकडे कंत्राटी पद्धतीने दिलेले आहे. ऑपरेटरच दस्त तयार करतात. कोणताही दस्त तयार करायचा असेल तर त्यांचे दर ठरलेले आहेत. तुम्हाला कायदा कितीही माहिती असला व तुमचे काम कितीही कायद्यात योग्य प्रकारे बसणारे असले तरी निबंधक २ हजार, ऑपरेटर १ हजार आणि शिपाई ५०० रुपये असे अडीच हजार रुपये तुम्हाला वरचे द्यावेच लागतात. त्याशिवाय तुमचे काम होतच नाही. तेथील कोणतीही माहिती अथवा सर्च रिपोर्ट तुम्हाला हवा असेल तर एजंटाकडे जावे लागते. एजंटाशिवाय महसूल विभागातील पानही हलत नाही. त्यामुळेच सर्वाधिक लाचखोरी त्यांच्यामार्फत चालताना दिसून येते.
या एजंटांवर वचक कोण बसविणार?
दुय्यम निबंधक कार्यालयातील एजंटावर लगाम घालण्याचा प्रयत्न अरुण भाटिया हे पुण्यात जिल्हाधिकारी असताना केला होता. दिवसभर जेवढे दस्त झाले त्यांची रक्कम आणि निबंधक, तेथील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे असलेली रक्कम याची तपासणी करण्यात आली. त्यातून जवळपास २० ते २२ उपनिबंधक व इतरांवर कारवाई करण्यात आली होती. अशा कारवाया नियमित झाल्या तरच दुय्यम निबंधक कार्यालयावरील एजंटांचा विळखा कमी होऊ शकेल.
पुणे विभागात महसूल विभागातील कारवाई
वर्ष सापळे अटक आरोपी खासगी व्यक्ती
२०१९ ४२ ५८ १७
२०२० ३६ ४९ १५
२०२१ ४९ ६१ २४
पुणे विभागात पोलीस विभागातील कारवाई
वर्ष सापळे अटक आरोपी खासगी व्यक्ती
२०१९ ५१ ७८ १६
२०२० ३३ ४४ ७
२०२१ ३६ ५२ १०