पुणे: बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील एजंट आरोपी अभिजित शशिकांत गटणे आणि रवींद्र महादेव रोडगे यांना गुरुवारी न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य खात्याने नियुक्त केलेल्या समितीला २८ मे रोजी या एजंटांचे जबाब नोंदविण्यासाठीही न्यायालयाने परवानगी दिली.
या प्रकरणातील दोघा एजंट आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी सार्वजनिक आरोग्य खात्याने नाशिक परिमंडळाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या वतीने दोघा एजंटांचे जबाब नोंदविण्यास परवानगी देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यानुसार, या समितीतर्फे येत्या २८ मे रोजी या दोन्ही एजंट आरोपींचे जबाब नोंदविण्यात येणार आहे.