पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध म्हणून शिवप्रेमी संघटनांनी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. यात मुस्लिम, शिख, दलित संघटनांनीदेखील सहभाग घेण्याचे जाहीर केले आहे. याबाबत आज, गुरुवारपासून शाळा, संस्था, कार्यालयांना आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूल (एसएसपीएम) च्या आवारातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ बुधवारी दुपारी बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे संजय मोरे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर, रवी आरडे, सुजित यादव, अंजूम इनामदार यांच्यासह वेगवेगळ्या सामाजिक, स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षावर यावेळी टीका करण्यात आली.
राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्राच्या थोर विभूतींबाबत वारंवार अवमानकारक बोलत आहेत. आता तर त्यांनी छत्रपती शिवरायांनाच जुना आदर्श केले आहे. भाजपचेच वाचाळवीर सुधांशू त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मनाला येईल त्याप्रमाणे काहीही बरळत आहेत, त्यामुळे हा सगळा ठरवून केला जात असलेला प्रकार असल्याची शंका अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली. याविरोधात आवाज उठविणे शिवप्रेमी म्हणून कर्तव्यच आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कोश्यारी यांना त्वरित राज्यपालपदावरून हटवावे, यासाठी पुणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर भाजपच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी यासाठी हा बंद असल्याचे सांगण्यात आले. पुण्यातील संस्था, सरकारी, खासगी कार्यालयांमध्ये जाऊन तिथे सर्वपक्षीय भूमिका स्पष्ट करून त्यांचा बंदला पाठिंबा मिळवण्यात येणार आहे. आज, गुरुवारपासूनच ही मोहीम सुरू करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.