पुणे/प्रतिनिधी/किरण शिंदे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. राज्यभरात ठीकठिकाणी भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध केला जात आहे. पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने आज भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन ठेवले होते. या आंदोलनात डमी भगतसिंग कोश्यारी यांना घेऊन येत त्यांचे धोतर फेडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. सारसबाग परिसरात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केले
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासारखी वेशभूषा परिधान केलेली एक व्यक्ती त्या ठिकाणी आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी या डमी भगतसिंग कोश्यारीचे धोतर फेडले. त्यानंतर हे धोतर फाडून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी घाणेरडी टिप्पणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन राज्यपालांना हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी करावी. अन्यथा राज्यपाल ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी महाराष्ट्रातील शिवप्रेमी यांचे धोतर फेडल्याशिवाय शांत राहणार नाहीत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावरून राज्यात चुकीची घटना घडली तर याला सर्वस्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.