मंचर : आंबेगाव तालुक्यातील बैलगाडामालकांनी शर्यती पुन्हा सुरू होण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटावी तसेच पेटा संस्थेवर बंदी यावी, या मागणीसाठी रविवारी (दि. २९) मंचर येथे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.तमिळनाडू राज्यात जलीकट्टू स्पर्धेसाठी नागरिक एकवटले आहे. त्या पार्श्वभूमीवर बैलगाडामालकांनी शर्यती सुरू होण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केले आहे. मंचर येथे बैलगाडामालकांची बैठक सोमवारी झाली. त्या बैठकीत पुढील रणनीती आखून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. या वेळी सरपंच दत्ता गांजाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, बैलगाडा विमा योजनेचे अध्यक्ष दत्ता थोरात, याचिकाकर्ते बाळासाहेब आरूडे, बजरंग दलाचे अध्यक्ष सुहास बाणखेले, बैलगाडामालक के. के. थोरात, संतोष मोरडे, संतोष बाणखेले, सरपंच विशाल तोत्रे, राजू निघोट, मयूर वाबळे, शांताराम भय्ये, उपसरपंच शिवाजी निघोट तसेच गाडामालक उपस्थित होते.शेकडो वर्षांची परंपरा असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. न्यायालयीन लढा सुरू असून आता जनमत तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैलगाडामालकांच्या वतीने मंचर येथे येत्या रविवारी आंदोलन करण्यात येणार आहे. पेटा संघटनेवर बंदी घालावी व बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नियोजन आज झालेल्या बैठकीत करण्यात आले. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होणार आहे. सर्व बैलगाडामालक व शौकीन यात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने कायदा करून शर्यतीवरील बंदी उठवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. (वार्ताहर)
शयर्तबंदीविरोधात आक्रमक पवित्रा
By admin | Published: January 24, 2017 1:46 AM