पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आली आहे. राज्यांचे उमेदवारही जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय पक्षांबरोबरच नव्या पक्षांनी लोकसभानिवडणूक लढण्याचे ठरवले आहे. अशातच भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने राज्यातील ३२ जागांवरील उमेदवार पुण्यात जाहीर करण्यात आले आहेत. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्याची आमची तयारी असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
इंडिया अगेंस्ट करप्शन या संघटनेच्या पुढाकाराने देशातील नोंदणीकृत ५० राजकीय पक्षांनी एकत्र येत ही आघाडी स्थापन केली आहे. आघाडीचे नेते हेमंत पाटील यांनी ही माहिती दिली. आघाडीच्या वतीने पुण्यात संभाव्य उमेदवारांची कार्यशाळा आयोजित केली होती. आघाडीचे प्रमुख भाऊसाहेब बावने, राजेंद्र वनारसे, शिवाजीराव म्हस्के, अशोक जाधव धनगावकर, रेणुका पानगावकर, प्रा. रेखा पाटील, सतीश देशमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, प्रस्थापित राजकीय पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे जनतेसमोर सक्षम पर्याय म्हणून आम्ही जात आहोत. सामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या निवडणुकीत आम्ही उतरत आहोत.