पुणे : श्रेष्ठींकडून उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमधील इच्छुक उमेदवारांचे समर्थक अस्वस्थ होऊ लागले आहेत. दिल्लीतच ठाण मांडून बसलेले उमेदवारही पुण्यात परतले असून, समर्थकांचा उत्साह कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी मात्र निवांत असून आधी प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार जाहीर होऊ द्या, मग आपला करू, अशा विचारात असल्याची चर्चा आहे.निवडणूक जाहीर होऊन आता आठवडा होऊन गेला तरी पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत अजूनही अनिश्चितताच आहे. काँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख पक्षांमध्ये या मतदारसंघात लढत होईल. काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी आहे, तर भाजपाबरोबर शिवसेना. मात्र या दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवारच अजून जाहीर होत नसल्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना या घटक पक्षांमध्येही आता चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांकडून अनेक उमेदवारांची नावे घेतली जात आहेत. भाजपाकडून विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांची नावे आहेत, तर काँग्रेसकडून भाजपाचे विद्यमान सहयोगी खासदार संजय काकडे, शेतकरी कामगार पक्ष व संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांची नावे आहेत.उमेदवारी आपल्यालाच मिळणार असे सांगत या इच्छुक उमेदवारांनी समर्थकांमध्ये उत्साह वाढवला होता. मात्र आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ आली तरीही उमेदवारी जाहीर होत नसल्याचे पाहून समर्थक अस्वस्थ झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या उमेदवार निश्चित करण्याच्या बैठकाही दिल्लीत सुरू आहेत. तिथे शक्तिप्रदर्शन वगैरे करणे शक्य नसल्याने इच्छुक उमेदवारांनाच दिल्लीत एकटे जाऊन परत यावे लागत आहे. दोन्ही पक्षांच्या सर्वच इच्छुक उमेदवारांच्या गेल्या महिनाभरातच अशा पाचपेक्षा जास्त दिल्लीवाऱ्या झाल्या आहेत. कार्यकर्ते इथेच व नेता दिल्लीत अशी स्थिती अहे. प्रत्येक वेळी परत आल्यावर समर्थकांची भेट घेऊन आपलीच उमेदवारी पक्की असे सांगून इच्छुक उमेदवारही आता कंटाळले असल्याचे दिसते आहे.शिवसेना व राष्ट्रवादी या युती व आघाडीच्या घटक पक्षांकडे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे, मात्र त्यांचा पक्षाचा उमेदवार नसल्यामुळे ते मित्रपक्षाच्या उमेदवाराचे नाव कधी जाहीर होईल, या प्रतीक्षेत आहेत.इच्छुक उमेदवारांनाही लागली हुरहूर1नाराजांची समजूत काढणे, दुखावलेल्या गटाला सक्रिय करणे अशा अनेक गोष्टींना उमेदवाराला बराच वेळ द्यावा लागतो. थोडी आधी उमेदवारी जाहीर झाली तर उमेदवाराला त्यासाठी वेळ मिळतो. ऐन वेळी उमेदवारी जाहीर झाली, की धावपळ होते व या गोष्टींकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांमध्येही करा लवकर नाव जाहीर, अशी चर्चा होत आहे.2शिवसेना-भाजपा यांची युती जाहीर झाल्यानंतर पहिलाच संयुक्त मेळावा सोमवारी होणार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यासाठी उपस्थित राहणार होते. दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये या संयुक्त मेळाव्यामुळे उत्साह संचारला होता. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे हा संयुक्त मेळावा रद्द करावा लागला. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
आघाडी, युती निवांतच : इच्छुक उमेदवारांचे समर्थक अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:45 AM