पुणे: पश्चिम बंगाल येथील निवडणुकीनंतर बंगाल मध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. जवळपास २८ कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हत्या झाल्या आहेत. बंगाल मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक राज्यात भाजपकडून आवाज उठवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज सामाजिक अंतर राखत आंदोलन करण्यात आले.
या वेळी बोलताना आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या, पश्चिम बंगाल मधील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ३ वरून ७७ जागा आल्या आहेत. त्याचा राग बहुदा ममता दिदींच्या बांगलादेशी गुंडाना आला असावा. बंगाल मध्ये अराजकता माजली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी तसेच त्यांच्या गुंडांचा निषेध करावा तितका थोडा आहे.
हे आंदोलन कसबा मतदारसंघाच्या प्रभागात घेण्यात आले. या आंदोलनात मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस छगन बुलाखे, राजेंद्र काकडे, ऍड राणी सोनवणे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक, महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी पांडे आदी सहभागी झाले होते.