पुणे : दर बुधवारी आणि रविवारी रस्त्यावर भरणारा जुना बाजार पाेलिसांकडून बंद करण्यात आला. हा बाजार भर रस्त्यावर भरत असल्याने तसेच वाहतुकीसाठी केवळ एक लेन उपलब्ध हाेत असल्याने या भागात माेठी वाहतूक काेंडी हाेत हाेती. त्यामुळे पाेलीस प्रशासनाने हा जुना बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विराेधात येथील व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदाेलन केले. काेणाचेही नुकसान हाेऊ न देता व्यावसायिकांचे पुर्नवसन करण्याचे आश्वासन आमदार दिलीप कांबळे यांनी दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवार पेठ येथील मुख्य रस्त्यावर जुना बाजार भरताे. दर बुधवारी आणि रविवारी रस्त्यावर सातशे ते आठशे व्यावसायिक व्यवसाय करतात. वाढत्या वाहनसंख्येमुळे या भागात वाहतूक काेंडी हाेत हाेती. त्यामुळे पाेलिसांनी रस्त्यावरचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याच बराेबर रस्त्यावर वाहने लावण्यास देखील प्रतिबंध करण्यात आला. प्रायाेगिक तत्त्वावर हा प्रयाेग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आज बाजाराचा दिवस असल्याने शेकडाे व्यावसायिक या भागात जमा झाले हाेते. परंतु रस्त्यावर व्यवसाय करण्यास पाेलिसांकडून मज्जाव करण्यात आला. पाेलिसांचा माेठा फाैजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला हाेता. व्यावसायिकांनी रस्त्यातच ठिय्या आंदाेलन केले. तसेच व्यवसाय पुन्हा सुरु करु देण्याची मागणी केली. यात महिलांची संख्या लक्षणीय हाेती.
या भागातील आमदार दिलीप कांबळे यांनी दुपारी आंदाेलकांची भेट घेतली. तसेच सर्व व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. पुनर्वसनासाठी जाे काही निधी लागेल ताे सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी या भागाची पाहणी केली. मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूला असणाऱ्या अनेक व्यावसायिकांची अतिक्रमणे काढून टाकण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रस्त्यावरच्या व्यवासायिकांची आतल्या बाजूला तसेच मुख्य रस्त्यावरील एका लेनमध्ये व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. दरम्यान आज बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.