पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर ही ऐतिहासिक वास्तू पाडून ठीकाणी तीन मजली नवी इमारत उभी केली जाणार आहे. त्याला राजकीय नेते आणि कलाकार यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. नाट्यकर्मींमध्येही नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बालगंधर्व रंगमंदिर बचाव समितीमार्फत घंटानाद आंदोलन करण्यात आले. 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जावू रंगमहाल' लावणी सादर करून कलावंतांनी पुणे महापालिकेत सत्ताधारी राहिलेल्या भाजपाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले म्हणाले, बालगंधर्वच्या कामाबाबतच्या चर्चेत १० कोटींचा खर्च येणार होता. परंतु तोच ११० कोटी दाखवला जात आहे. यामध्ये नक्की काय करणार आहेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर महापालिकेवर प्रशासक असल्याने कशा प्रकारे काम होईल हे सांगता येत नाही. आमच्या कलाकार मंडळींसाठी पर्यायी जागा कोणती असणार, तिथे प्रेक्षक येईल का असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. हे सर्व प्रश्न लक्षात घेता ही वास्तू पाडू नये, अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
असे असणार नवीन बालगंधर्व
बालगंधर्व रंगमंदिराची २०१८ साली स्थायी समिती अध्यक्ष असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतुद आहे. परंतु, कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालावधीत पुनर्विकासाचा विषय काही वेळ बाजूला राहीला होता. मात्र या काळात पुण्यातील ज्येष्ठ कलाकार, महापालिकेतील सर्वपक्षीय नेते, मनपा अधिकारी आणि वास्तुविशारद या सर्वांची एकत्रित समिती नेमून या विषयावर सर्वांगाने चर्चा घडवून आणली, ज्यात पुनर्विकासाबाबत सकारात्मक कल दिसून आला. केवळ साडे २२ हजार स्क्वेअर फूटामध्ये उभ्या असणाऱ्या या रंगमंदिराला वाढवून साडेतीन लाख स्क्वेअर फुटांमध्ये विस्तारण्यात येणार आहे. सध्या १०० दुचाकी व २० ते २५ चारचाकी वाहनांची पार्किंग क्षमता आहे. परंतु नवीन वास्तूमधे ९०० दुचाकी व जवळपास २५० चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था असणार आहे. कलावंत आणि रसिकांच्या मागण्या लक्षात घेऊन, एक ऐवजी आता १०००/५००/३०० इतक्या आसन क्षमतेची तीन नवीन प्रेक्षागृह उभी राहणार आहेत. तर नव्या वास्तूमध्ये सुसज्ज असे १० हजार फुटाचे एक आणि प्रत्येकी ५ हजार फुटाची दोन, अशी तीन कलादालने उभारण्यात येणार आहेत. तसेच यात पु. ल. देशपांडे आणि ५४ वर्षांच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत.