सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांसोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड इ. लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील रंगकर्मीचाही या आंदोलनात सहभाग असणार आहे.
कलावंतांना आपली कला सर्वत्र सादर करण्याची व त्यासाठी प्रवास करण्याची परवानगी मिळावी, चित्रीकरण, थिएटर व सांस्कृतिक कार्यक्रम त्वरित सुरू करावेत, जे कलाकार मुलांच्या शाळेची फी भरू शकत नाहीत, त्यांच्या मुलांना शाळेत मोफत प्रवेश मिळण्यासाठी शासनाने नियम करावा, लाईट बिल माफ करावे किंवा सवलत द्यावी, कलाकारांसाठी रोजगार हमी योजना लागू करावी, मराठी चित्रपटांना अनुदान मिळावे आदी मागण्या तातडीने मान्य व्हाव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.
-----
कायम स्वरूपी मागण्या
१. सर्व कलाकारांची सरकार दरबारी रितसर ‘कलाकार’ म्हणून नोंद व्हावी.
२. कलाकार पेन्शन योजनेत लाभार्थीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटीमध्ये शिथिलता आणावी. तसेच मानधनात वाढ करावी.
३. रंगकर्मी हा असंघटीत आहे, त्यामुळे ‘माथाडी कामगार बोर्डा’च्या धर्तीवर ‘रंगकर्मी बोर्डा’ची स्थापना करावी.
४. मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या रंगकर्मीना भाडे तत्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या गाळ्यामध्ये प्राधान्याने व सवलतीच्या दारात सोय करण्यात यावी. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रंगकर्मीसाठी विश्रांतीगृह असावीत.
५. शासनातर्फे रंगकर्मीसाठी राखीव ठेवलेल्या म्हाडा व सिडकोच्या घरांसाठीच्या संख्येत ५% वाढ करावी.
६. निराधार, वयोवृद्ध रंगकर्मीची शासकीय आणि खासगी वृद्धाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी. सोबत त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी.
७. महाराष्ट्रातील सरकारी तसेच नगरपालिका/जिल्हापरिषद रुग्णालयामध्ये रंगकर्मीसाठी राखीव बेड असावा.